एक डोस घेतलेल्यांना दिवाळीनंतर दोन मात्रा घेतलेल्यांसारखी सवलत ?

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ ऑक्टोबर । कोरोना रुग्णसंख्या राज्यात कमी होत असल्याने रेल्वे प्रवास, मॉल्समध्ये प्रवेशास परवानगी देणार, गणेशोत्सव व दसऱ्यानंतरही कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात राहिल्याने दिवाळीनंतर परिस्थिती पाहून लसीची एक मात्रा (डोस) घेतलेल्या नागरिकांना दोन मात्रा घेतलेल्या नागरिकांप्रमाणे सवलती देण्याचा विचार सुरू आहे, अशी दिलासादायक माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली.

टोपे म्हणाले, सवलत देण्याबाबत कोरोना राज्य कृती दल, आरोग्य विभाग आणि मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केल्यानंतरही निर्णय होईल. सध्या कोविशील्डच्या दोन मात्रांमधील अंतर ८४ दिवसांचे आहे. त्यामुळे अशा नागरिकांची अडचण लक्षात घेऊन सरकार सवलत देण्याचा विचार करत आहे. रेल्वे प्रवास, मॉल्समध्ये प्रवेशाबाबत अजूनही निर्बंध आहेत. त्यातून नागरिकांची सुटका होऊ शकते. राज्यातील कोरोना रुग्णसंख्या सातत्याने कमी होत आहे. सणासुदीचा काळ पाहता कोरोनाबाधितांची संख्या वाढू शकेल, अशी भीती असली तरी रुग्णसंख्येत घसरण दिसत आहे. सक्रिय रुग्ण सातत्याने कमी होत आहेत. सध्या फक्त ३० हजार सक्रिय रुग्ण आहेत, असे टोपे यांनी सांगितले. सध्या राज्य सरकारने शाळा, मंदिरे, चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरू केली आहेत. बुधवारपासून राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालये सुरू होत आहेत. राज्यात आजच्या घडीला साडेसहा कोटींहून अधिक (७० टक्के) नागरिकांना किमान पहिली, तर २.९ कोटी (३२ टक्के) नागरिकांना दुसरी मात्रा मिळाली आहे, असे टोपे म्हणाले.

भिसी आरोग्य केंद्रात २७०० डोस गोठल्याची गंभीर दखल
चंद्रपूर | चिमूर तालुक्यातील भिसी आरोग्य केंद्रात २७०० कोरोना लस निकामी झाल्याची घटना समोर येताच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी भिसीच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. भिसी केंद्राला कोविशील्डचे १६००, कोव्हॅक्सिनचे १०० डोस तसेच कोविशील्डचे १००० डोस असे एकूण २७०० डोस पुरवण्यात आले होते. हा साठा डीप फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे २७०० डोस गोठून निकामी झाले आहेत. या प्रकरणी डॉ. प्रियंका कष्टी व आरोग्य सहाय्यिका शीला कराळे यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या.

म्हणून रुग्ण वाढण्याची शक्यता कमी
१५ नोव्हेंबरपर्यंत ८०% नागरिकांना किमान पहिली मात्रा, तर ४० टक्के नागरिकांना दुसरी मात्रा मिळू शकते. परिणामी हर्ड इम्युनिटी तयार होईल. त्यामुळे दिवाळीच्या काळात नागरिकांचे स्थलांतर झाले तरी रुग्ण वाढण्याची शक्यता कमी राहील, असा दावा टोपे यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *