धावपट्टीवर अचानक आलेल्या कोल्ह्याने रोखले चिपी विमानतळावर लँडिंग

 239 total views

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ ऑक्टोबर । काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गातील बहुचर्चित चिपी विमानतळाचे मोठ्या जल्लोषात उद्घाटन करण्यात आले आणि या विमानतळावरुन विमान सेवा सुरु झाली. पण, नव्याने सुरु करण्यात आलेल्या या विमानतळावरील एका घटनेमुळे दहा मिनिटांसाठी विमानाचे लॅन्डिंग रखडले होते. मुंबईवरून आलेल्या विमानाला धावपट्टीवर उतरण्यासाठी दहा मिनिटे अवकाशात घिरट्या घालण्याची वेळ आली. यासाठी कोल्हा कारण ठरला. अचानक धावपट्टीवर आलेल्या कोल्ह्यामुळे यंत्रणेचीही तारंबळ उडाली.

सिंधुदुर्ग विमानतळ सुरु झाल्यानंतर या विमानतळावर असा एक प्रसंग घडला की, धावपट्टीवर उतरण्यासाठी मुंबईवरून आलेल्या विमानाला दहा मिनिटे अवकाशात घिरट्या घालण्याची वेळ आली. कारण या धावपट्टीवर कोल्हा आला होता. हा कोल्हा धावपट्टीवर असल्याचे विमानाच्या पायलटला समजले. त्यांनी तात्काळ विमान पुन्हा आकाशात झेपावले आणि संबंधित यंत्रणेला या कोल्ह्याला धावपट्टीवरून बाहेर काढण्यास सांगितले. या कोल्ह्याला धावपट्टीवरून बाहेर काढल्यानंतर दहा मिनिटांनी विमान धावपट्टीवर उतरविण्यात आल्यामुळे प्रवाशांमध्ये सुरुवातील भिती निर्माण झाली होती. तसेच यावरुन विविध चर्चा रंगल्याचेही पाहायला मिळाले.

कोल्ह्यांचा कळप चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळाच्या आजूबाजूला आहे आणि आपल्या भक्षकासाठी हे कोल्हे फिरत असतात. दरम्यान विमानतळाचे उद्घाटन झाल्यानंतर या विमानतळावर पहिल्यांदाच कोल्ह्याचे दर्शन झाले. विमानसेवा सुरु झाल्यानंतर काही दिवसांनी या धावपट्टीवर कोल्ह्यांचा वावर दिसला. मुंबईवरून सिंधुदुर्ग विमानतळावर उतरणाऱ्या विमानाच्या पायलटला धावपट्टीवर प्राणी असल्याचे निदर्शनास आले. हे विमान धावपट्टीवर न उतरता पायलटने पुन्हा विमान आकाशात झेपावले आणि संबंधित यंत्रणेला धावपट्टीवर कोणता तरी प्राणी असल्याचे सांगितले तात्काळ सुरक्षा यंत्रणेकडून धावपट्टीवर पाहणी केली असता त्यांच्या निदर्शनास कोल्हा असल्याचे दिसून आले.

कोल्ह्याला या सुरक्षा यंत्रणेने धावपट्टीवरून बाहेर काढले. त्यानंतर या धावपट्टीवर हे विमान दहा मिनिटांनी उतरविण्यात आले. पण प्रवाशांमध्ये याची चर्चा चांगलीच रंगली होती. या विमानतळाच्या सर्व बाजू संरक्षण भिंत असून पूर्णपणे बंदिस्त केले आहे. तरी हा कोल्हा कोणत्या मार्गाने धावपट्टीवर आला याचा शोध सुरक्षा यंत्रणा घेत आहे. जेणेकरुन पुन्हा असा प्रकार टाळण्यास मदत होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *