महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ ऑक्टोबर । : विमानाचे तिकीट दर आता रेल्वेच्या एसी-२ टायर अर्थात द्वितीय श्रेणी वातानुकूलित प्रवासापेक्षा स्वस्त होणार आहे. केंद्र सरकारने करोना निर्बंध शिथिल करीत आज, सोमवार, १८ ऑक्टोबरपासून विमानसेवा १०० टक्के क्षमतेने सुरू करण्याला हिरवा कंदिल दिला आहे. त्यामुळे दिवाळीनंतर विमानाचे तिकीट दर निम्म्याहून कमी होत आहेत.
करोना निर्बंधांमुळे विमानोड्डाणांवर सध्या निर्बंध होते. एक आसन सोडून प्रवाशांना तिकीट दिले जात होते. त्यामुळे विमानसेवा कंपन्यांना कमी प्रवाशांना तेवढ्याच इंधनखर्चात विमान उडवावे लागत होते. परिणामी तिकीटदर महागले होते. मात्र, आता सोमवारपासून विमानाची आसने १०० टक्के भरण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे विमानसेवा कंपन्यांना तेवढ्याच इंधन खर्चात अधिक महसूल मिळणार आहे. यामुळेच विमान तिकीटदर कमी होणार आहेत.
मुंबईहून नागपूरसाठी किंवा नागपूर-मुंबईसाठी सध्या ४,५०० ते ५,२०० रुपये तिकीट दर आहे. तर मुंबई-दिल्ली प्रवासासाठी सध्या ४,५०० ते ५,९०० रुपये मोजावे लागत आहेत. हेच तिकीट मुंबई-गोवा प्रवासासाठी ३,८०० ते ४,२०० रुपये तर मुंबई-बेंगळुरूचे तिकीट ४,५०० ते ५,७०० रुपयांच्या घरात आहे. पण १०० टक्के आसन क्षमतेच्या परवानगीनंतर आता मुंबई-नागपूरचे तिकीट २,१००, मुंबई-दिल्लीचे तिकीट २,४०० ते २,८००, मुंबई-गोव्याचे तिकीट १,८०० ते २,२००; तर मुंबई-बेंगळुरूचे तिकीट जेमतेम २,५०० रुपये होणार आहे. मात्र, हे सर्व स्वस्त तिकीट दर दिवाळीच्या सुट्ट्यांनंतर लागू होणार आहेत.
याबाबत हवाई क्षेत्रातील सूत्रांनी सांगितले की, ‘सध्या सण आणि सुट्ट्यांचा काळ असल्याने हवाई प्रवासाला गर्दी आहे. त्यामुळेच दिवाळीनंतर हा निर्णय लागू केला जाईल. सध्या मागणीमुळे दर कमी करता येणे शक्य नसल्याचा विमानसेवा कंपन्यांचा दावा आहे. तसे असले तरी मुंबई-नागपूर दुरोंतो प्रवासाचे एसी-२ चे तिकीट २,६०० ते २,९०० तर मुंबई-दिल्लीचे एसी-२ तिकीट ३,२०० रुपयांच्या घरात आहे. तेजस्विनी राजधानीचे तिकीट आणखीनच महाग आहे. त्या तुलनेत विमान प्रवास स्वस्त असेल.’