शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरण; ८१ कोटींचा गैरव्यवहार उघड, रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्बंधनानंतरही २ कोटी १७ लाख रुपये काढले

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24-पुणे
शिवाजीराव भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणात आणखी ८१ कोटी ५० लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे तपासात उघड झाले आहे. रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाने र्निबध घातल्यानंतरही २ कोटी १७ लाख रुपये काढण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, ८१ कोटी ५० लाख रुपयांचे गैरव्यवहार उघड झाल्यानंतर फसवणूक प्रकरणाची व्याप्ती १५३ कोटी ५० लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

शिवाजीराव भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणात विधान परिषदेतील आमदार आणि बँकेचे अध्यक्ष अनिल शिवाजीराव भोसले (वय ५५, रा. बाणेर रस्ता), संचालक सूर्याजी पांडुरंग जाधव (वय ६९, रा. कमला नेहरू पार्क, एरंडवणे), मुख्य अधिकारी तानाजी दत्तू पडवळ (वय ५०, रा. तापकीरनगर, काळेवाडी), बँकेचे मुख्य हिशेब तपासणीस शैलेश संपतराव भोसले (वय ४७, नीलज्योती सोसायटी, गोखलेनगर) यांना नुकतीच अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयाने सहा मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या प्रकरणाचा आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास करण्यात येत आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम म्हणाले,की या प्रकरणातील चौघा आरोपींचे बँक खाते, स्थावर जंगम मालमत्तेबाबत माहिती घेण्यात आली. चौकशीत बँकेच्या आणखी एका संचालकाचे नाव समोर आले आहे. बँकेत अनुत्पादित कर्जे (एनपीए) दिसू नयेत म्हणून बँकेने ८० कोटी रुपयांची रोखपत (कॅश क्रेडीट) दिली आहे. त्यासाठी २३ धनादेशांचा वापर करण्यात आला आहे.

बँकेतील आर्थिक गैरव्यवहार निदर्शनास आल्यानंतर रिझव्‍‌र्ह बँकेने ६ मे २०१९ रोजी आदेश दिले होते. त्यानुसार बँकेवर आर्थिक र्निबध घालण्यात आले होते. त्यामुळे बँकेतील खातेदारांना केवळ एक हजार रुपये काढण्याची मुभा देण्यात आली होती.आर्थिक र्निबध असताना बँकेतून २ कोटी १७ लाख रुपये काढण्यात आल्याचे तपासात आढळून आले आहे.

लेखापरीक्षकांची चौकशी
शिवाजीराव भोसले बँकेत अनियमितता असताना लेखा परीक्षकांच्या निदर्शनास ही बाब आली का नाही, त्यांनी याबाबत बँकेला काही इशारा किंवा सूचना दिल्या होत्या का, याबाबतची माहिती घेतली जाणार आहे. लेखापरीक्षकांची चौकशी केली जाणार असल्याचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *