वादळी पाऊस आणि गारपिटीचा फटका पिकांचे नुकसान; द्राक्ष, डाळिंब, आंब्याला फटका

Spread the love

महाराष्ट्र २४; – पुणे – वाशीम, जालना, औरंगाबाद, उस्मानाबाद, नगर, नाशिक, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील काही भागांत शनिवारी (ता. २९) सायंकाळी आणि रविवारी (ता. १) पहाटे वादळी पावसासह गारपीट झाली. त्यामुळे रब्बीतील काढणीला आलेल्या गहू, ज्वारी, हरभरा, मक्यासह कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले. राज्यात अनेक भागांत काढणीला आलेल्या द्राक्षांसह डाळिंब आणि आंबा मोहरालाही वादळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसला.

नाशिक जिल्ह्यात पाऊस आणि गारपिटीने काढणीस आलेल्या रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले. गारांच्या तडाख्यामुळे काढणीस आलेल्या मोसंबी व द्राक्ष बागांना मोठा फटका बसला. गहू वादळी वाऱ्यामुळे शेतातच आडवा झाला, तर अनेक भागांत गहू भिजला. जळगाव खुर्द येथेही गहू, हरभरा आदी पिके आडवी झाली. सायंकाळी घरी परत येणाऱ्या जनावरांनाही गारपिटीचा तडाखा बसला. लागवड केलेल्या उन्हाळ कांद्यालाही फटका बसला.
मराठवाड्यातील काही भागांत अवकाळी पावसाने शनिवारी सायंकाळी व रविवारी पहाटे दणका दिला. काढणीला आलेली आणि सोंगून ठेवलेली पिके भिजली तर पावसाबरोबर आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे उभी पिके आडवी झाली.

सोलापूर जिल्ह्यात रविवारी उत्तर सोलापूर, बार्शी, मोहोळ आणि माढा भागात गारांसह अवकाळी पावसाने ज्वारी, गहू, हरभरा, मका या काढणीस आलेल्या पिकांना त्याचा फटका बसला. द्राक्ष आणि डाळिंब बागांना सर्वाधिक फटका बसला आहे. सध्या रब्बी ज्वारीची काढणी आणि द्राक्षहंगाम सुरू आहे. उत्तर सोलापूर, बार्शी भागात द्राक्षाचे क्षेत्र चांगले आहे. काही भागात डाळिंबही आहे. या फळबागांना त्याचा फटका बसला.

सातारा जिल्ह्यातील माण परिसरात बिजवडी, राजवडी, पाचवड, अनभुलेवाडी, जाधववाडी आदी गावांतील पिकांना फटका बसला. शेतात ज्वारी, कांद्याची काढणी करणाऱ्या शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. ज्वारीची कणसे, कडबा, कांदा उघड्यावरच असताना अचानक आलेल्या पावसाने नुकसान झाले. बहार धरलेल्या फळबागांनाही फटका बसण्याची शक्यता आहे.

या पावसाने पक्व द्राक्ष मण्यांना पावसाच्या पाण्याचा चांगला मारा बसला. त्यामुळे काही प्रमाणात द्राक्षगळ झाली. अनेक भागात ज्वारी, गहू, हरभऱ्याची काढणी सुरू आहे. काहींनी ज्वारी, गहू काढून ठेवला आहे. या पावसामुळे तो भिजला. या पावसामुळे ज्वारी काळी पडण्याची शक्यता आहे. नगर जिल्ह्यात नगर, पाथर्डी, राहुरी, कर्जत तालुक्यांतील काही भागांत सरी कोसळल्या. बऱ्याच ठिकाणी गारपीटही झाली. त्यामुळे काढणीला आलेल्या गहू, ज्वारीला फटका बसला आहे.

कर्नाटकच्या समुद्र किनारपट्टीपासून ते नैऋत्य मध्य प्रदेश या दरम्यान वाऱ्याची चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाच्या सरी पडल्या. या वाऱ्यांचा प्रभाव पुढील चोवीस तासांमध्ये कमी होईल. त्यामुळे येत्या सोमवारपासून (ता. २) पुढील दोन दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता आहे, असे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *