महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ ऑक्टोबर । पुण्यातील रक्तपेढ्यांमध्ये आठवडाभर पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यापासून दिवाळीपर्यंतच्या नियोजित शस्त्रक्रियांसाठी रक्तसाठ्याचे व्यवस्थापन ही रक्तपेढ्यांपुढील मोठी डोकेदुखी ठरणार आहे. रक्तपेढ्यांमध्ये सध्या शहरातील रक्ताची गरज पूर्ण होईल, इतकाच साठा आहे. त्याचा परिणाम दिवाळीच्या आधी आणि नंतर नियोजित केलेल्या शस्त्रक्रियांवर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे रक्तसाठ्याचे नियोजन करताना कसरत करावी लागणार असल्याची शक्यता रक्तदान क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांनी व्यक्त केली.
शहरातील रोजची रक्ताची गरज ६०० बॅग्जची आहे.
ही गरज नियोजित रक्तदान शिबिरांमधून पूर्ण होते. त्यापैकी काही शिबिरे ही गणपती मंडळे, ढोल-ताशा पथक आणि सामाजिक संस्थांकडून होतात.
माहिती तंत्रज्ञान कंपन्यांमध्येही रक्तदान शिबिरे होत आहेत. पण, अजूनही पूर्ण क्षमतेने या कंपन्या सुरू झालेल्या नाहीत, त्यामुळे तेथे रक्तदान शिबिरांना मर्यादा आहे.
महाविद्यालये आणि विद्यापीठे आता सुरू झाली. मात्र, त्याच वेळी परीक्षा आहेत. त्यामुळे तेथील रक्तदान शिबिरांच्या आयोजनाची संख्याही कमी आहे.
औद्योगिक वसाहती पूर्णक्षमतेने सुरू आहेत. त्यामुळे तेथे काही प्रमाणात रक्तदान शिबिरे झाली आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर येथील रक्तदान शिबिरांची संख्या कमी आहे.