बाळासाहेबांना हयात असताना छळण्याचे काम तुम्ही कसं केलं, ते सांगावं लागेल ; केंद्रीय मंत्री नारायण राणे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ ऑक्टोबर । मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दसऱ्या मेळाव्यातील भाषणावर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जोरदार टीका केली आहे. बाळासाहेबांना हयात असताना छळण्याचे काम तुम्ही कसं केलं, ते सांगावं लागेल’, असा इशाराच राणे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला. साहेबांना जे जमले ते तुम्हाला नाही जमायचं. जाहीर भाषणामध्ये क्षणोक्षणी साहेबांचे नाव घेऊन सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका. अन्यथा ते हयात असताना त्यांना छळण्याचे काम तुम्ही कसं केलं, ते सांगावं लागेल असे राणे म्हणाले. नारायण राणे यांनी ‘हार आणि प्रहार’ या सदरातून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसे झाले? ‘त्या’ रात्री काय घडले? यावर देखील राणेंनी भाष्य केले. मला शरद पवारांनी मुख्यमंत्री केले, असे उद्धव ठाकरे सांगतात. पण ते नेमके मुख्यमंत्री कसे झाले ते आम्हाला माहीत आहे, अशा शब्दांत राणेंनी थेट निशाणा साधला आहे. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय होण्याच्या आदल्या रात्री संजय राऊत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना घेऊन पवारांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यावेळी त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे किंवा इतर कोणी शिवसैनिक नव्हता. ‘साहेब आम्हाला शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचे होते, पण काही कारणामुळे ते शक्य नाही. त्यामुळे आता मलाच मुख्यमंत्री करा, अशी विनंती करायला आलो आहे’ , असे या भेटीदरम्यान उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना सांगितले असल्याचा आरोप राणेंनी केला आहे.

‘मेळाव्याच्या सुरुवातीला शस्त्रपूजेनंतर उद्धव ठाकरे यांनी व्यासपीठावर पुढे येऊन हातातील ओंजळभर फुले समोर उपस्थित शिवसैनिकांवर उधळली. उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मूर्ख समजतात काय? त्यांनी उधळलेल्या फुलांची एक-एक पाकळी शिवसैनिकांनी घरातल्या कपाटात नेऊन ठेवली, तर ती धनलक्ष्मी होणार आहे काय? त्यातून शिवसैनिकांचा संसार चालून उदरनिर्वाह होणार आहे काय?’ ‘मागच्या दोन वर्षात त्यांनी शिवसैनिकांच्या नोकरी-धंद्याचा, पोटा-पाण्याचा प्रश्न हाताळण्याचा प्रयत्न केला काय? शिवसैनिक या मानवी रुपातील शस्त्राला अन्न, वस्त्र आणि निवारा मिळवण्यासाठी काय केले? या दोन वर्षांत शिवसैनिकांच्या हातावर तुम्ही काय ठेवलं? असा सवाल देखील राणेंनी उपस्थित केला.

‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज कुणावर आसूड ओढणार.., असा उल्लेख सामनामध्ये आला आहे. त्यांचे कुणाशी वैमनस्य आहे? सांगावे की! महाराष्ट्राच्या जनतेवर आसुड ओढणार का? हिंमत असेल, तर अंगावर या, ही डरकाळी आहे का? डरकाळी कुणी द्यावी? कुणाच्या जीवावर? भाषण करताना हात वर करून आव आणणं वेगळं आणि अंगावर आलेल्यांना समोरून जबाब देणं वेगळं. शिवसैनिकांच्या ताकदीवर आणि हिंमतीवर शिवसेना वाढली. नवीन आलेल्या पुळचट, घाबरट लोकांमुळे शिवसेना वाढली नाही. कुणाच्या गालाला पाच बोटं सुद्धा न लावणारे, हिंमत असेल, तर अंगावर या म्हणतात, यापेक्षा मोठा विनोद कोणता?’, असा टोला देखील राणेंनी लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *