महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ ऑक्टोबर । भारतात येणाऱ्या परदेशी प्रवाशांसाठी केंद्र सरकारने बुधवारी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. त्यानुसार परदेशातून भारतात येणाऱ्या सर्व प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सादर करणे बंधनकारक आहे. प्रवासाच्या 72 तास आधी ही चाचणी केली पाहिजे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
देशात सध्या कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत आहे. मात्र महामारी पूर्णपणे संपलेली नाही. त्यामुळे सरकारकडून पूर्ण खबरदारी बाळगूनच निर्बंध शिथिल केले जात आहेत. याच अनुषंगाने बुधवारी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली. परदेशी प्रवाशांना भारतात एण्ट्री करताना आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सादर करावा लागणार आहे. त्यासोबतच तो अहवाल खरा असल्याचे घोषणापत्रही द्यावे लागणार आहे.
अनेक देशांतील कोरोना थैमान अजून कमी झालेले नाही. त्या पार्श्वभूमीवर सरकारने कोरोना संसर्गाच्या दृष्टीने धोकादायक असलेल्या देशांची यादी तयार केली आहे.या यादीमध्ये युरोपातील देश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, बांगलादेश, बोत्सवाना, चीन, मॉरिशस, न्यूझीलंड आणि झिम्बाब्वे या देशांचा समावेश आहे. या देशांतून येणाऱ्या नागरिकांनी भारतातील कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करावे, असे सक्त निर्देश देण्यात आले आहेत.