महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ ऑक्टोबर । टी20 वर्ल्ड कपच्या पात्रता फेरीतील (T20 World Cup 2021 qualifying round) आता फक्त 2 मॅच बाकी आहेत. शनिवारपासून मुख्य स्पर्धेला सुरुवात होईल. दोन गटातील 8 टीममध्ये पात्रता फेरीच्या मॅच होत आहेत. यामधील टॉप 4 टीम मुख्य फेरीत (ICC T20 World Cup 2021 Main Round) खेळणार आहेत. गुरुवारी झालेल्या 2 मॅचनंतर 4 पैकी 3 टीम नक्की झाल्या आहेत. तर उर्वरित एका जागेचा निर्णय आज (शुक्रवारी) होणार आहे.
कोणत्या टीमची जागा नक्की?
पात्रता फेरीतील B ग्रुपच्या सर्व मॅच गुरुवारी संपल्या आहेत. या गटातील 2 टीमची नावं आता निश्चित झाली आहेत. बांगलादेश, ओमान, स्कॉटलंड आणि पीएनजी या चार टीमचा या गटात समावेश होता. यापैकी स्कॉटलंडनं सर्व मॅच जिंकत अव्वल क्रमांकासह ग्रुप 2 मध्ये प्रवेश केला आहे.
या गटात भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड या टीम आहेत. तर सुरुवातीला झालेल्या धक्कादायक पराभवानंतर बांगलादेशनं पुढील दोन मॅच जिंकत मुख्य फेरी गाठलीय. बांगलादेशनं ग्रुप 1 मध्ये प्रवेश केलाय. यामध्ये ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज या टीम आहेत.
ग्रुप A मध्ये श्रीलंका, आयर्लंड, नामिबिया आणि नेदरलँड्स या चार टीम आहेत. यापैकी श्रीलंकेचा मुख्य फेरीतील प्रवेश नक्की झालाय. श्रीलंकेनं पहिल्या दोन मॅच जिंकल्या असून त्यांची एक मॅच अद्याप बाकी आहे. तर शेवटच्या टीमचा निर्णय आयर्लंड विरुद्ध नामिबिया यांच्या शुक्रवारी होणाऱ्या मॅचनंतर होणार आहे. या दोन्ही टीमनं एक मॅच जिंकली आहे. तर या गटातील नेदरलँडचे आव्हान आता संपुष्टात आलं आहे. A ग्रुपमधील दोन्ही टीम कोणत्या गटात जाणार याचा निर्णय शुक्रवारी होणाऱ्या दोन्ही मॅचनंतर स्पष्ट होईल.