महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ ऑक्टोबर । ‘‘कोरोनाची दुसरी लाट संपल्याचे दिसत आहे; सध्या ‘डेल्टा’ या कोरोनाच्या प्रकारचाच संसर्ग असून, नवा कोणताही विषाणू आढळून आला नाही. त्यावर रोज राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत (एनआयव्ही) संशोधन सुरू आहे. त्यासाठी दिवसगाणिक शंभर नमुने तपासले जात आहेत,’’ असे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी सांगितले.
व्यवहार पूर्ववत आणि सणासुदीतील लोकांच्या गर्दीमुळे दिवाळीनंतर काही प्रमाणात रुग्ण वाढण्याची भीतीही त्यांनी वर्तविली आहे. लसीकरणाचा वेग वाढवून कोरोनाला नियंत्रित ठेवण्याच्या लसीकरणाच्या मोहिमेच्या अनुषंगाने टोपे यांनी माहिती दिली.
“लहान मुलांना लस देण्याची नियोजन राज्य सरकारने केले आहे. मात्र, त्याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे ‘आयसीएमआर’कडून आलेली नाहीत. त्यामुळे लहान मुलांना लस देता येत नाही. या मोहिमेसाठी केंद्र लसही पुरवठा करण्याची भूमिका घ्यावी.”
– राजेश टोपे, आरोग्य मंत्री