सोन्याचा भाव देणारी व्हेल माशाची उलटी, रत्नागिरी चौघे संशयित तस्कर जेरबंद

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ ऑक्टोबर । रत्नागिरी : व्हेल माशाची सहा कोटी रुपये किमतीची उलटी जप्त करण्यात आली आहे. तस्करीच्या संशयाखाली चौघांना अटक करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात ही गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करण्यात आली. व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीबाबत अज्ञात व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार सापळा रचून वन विभाग रत्नागिरी आणि स्थानिक पोलीसांनी ही कारवाई केली. त्यांच्याकडून सुमारे सहा कोटींची व्हेल माशाची उलटी आणि एक कार जप्त करण्यात आली आहे.

संशयित आरोपीकडून 6.2 किलो वजनाची व्हेल माशाची उल्टी (Ambergris) जप्त करण्यात आली आहे. आरोपींच्या विरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, 1972 अन्वये परिक्षेत्र वन अधिकारी, चिपळूण यांच्याकडील प्र. गु. रि. 02/2021 अन्वये गुन्हा नोंद केला आहे.

देवमाशाची उलटी म्हणजेच अ‍ॅम्बरग्रिस हे हलक्या राखाडी किंवा काळ्या रंगाचे असते. तो मेणासारखा एक दगडसदृश्य पदार्थ असतो. व्हेल माशाने तो तोंडातून बाहेर फेकला की तो वाहत किनाऱ्यावर येतो. सुगंधी द्रव्ये, सुगंधी अत्तर, बॉडी स्प्रे, परफ्युम आणि अनेक औषधे तयार करण्यासाठी ते वापरले जाते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ते सोन्यासारख्या महाग किंमतीने विकले जाते. त्यामुळे अनेक ठिकाणी त्याची तस्करी करुन छुप्या पद्धतीने खरेदी-विक्री होत असल्याचे प्रकार उघडकीस येतात. अ‍ॅम्बरग्रीस हे व्हेल माशाच्या शरीरात तयार होत असून देवमाशाने तोंडावाटे ही उलटी बाहेर फेकल्यानंतर बहुतांश वेळा ते समुद्र किनारी सापडते.

देवगडचा प्रामाणिक मच्छिमार
दुसरीकडे, व्हेल माशाच्या उलटीची म्हणजेच तस्करी करणारे रॅकेट नुकतेच ठाण्यात पकडले होते, त्याचवेळी सिंधुदुर्गातील देवगडमध्येही एका मच्छिमाराला किनाऱ्यावर व्हेल माशाची उलटी सापडली होती. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या उलटीला सोन्याचा भाव आहे, मात्र मच्छिमाराने प्रामाणिकपणा दाखवत ही उलटी वन विभागाच्या ताब्यात दिली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *