![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ ऑक्टोबर । दोन्ही इंधनांचे दर पुन्हा एकदा उच्चांकावर गेले आहेत. डिझेलचे दर १०० रुपयांवर गेल्याने राज्यात आणि देशभर मालवाहतूकही महागली आहे. परिणामी अन्नधान्ये व भाज्या, फळे यांच्या किंमतीही वाढू लागल्या आहेत. ज्या ठिकाणी रिक्षा मीटरवर नाहीत, तिथे रिक्षाचालक ग्राहकांकडून जादा रक्कम मागू लागले आहेत. तसेच वडाप तसेच ग्रामीण भागांतील टॅक्सीचालक यांनीही भाड्यात वाढ केली आहे. खासगी तसेच शाळांच्या बसेसही डिझेल महागल्याने दरवाढ करण्याच्या तयारीत आहेत. टूर्स व ट्रॅव्हल कंपन्यांनी तर भाडे चार दिवसांपूर्वीच वाढवले आहे.
आजच्या दरवाढीनंतर राजधानी दिल्लीत पेट्रोल १०६.८९ रुपये लिटर, तर मुंबईत ११२.७८ रुपये लिटर झाले. डिझेलचे दर मुंबईत १०३.६३ रुपये, तर दिल्लीत ९५.६२ रुपये लिटर झाले.
१८ आणि १९ ऑक्टोबर असे दोन दिवस इंधनाच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. त्यानंतर आता सलग तिसऱ्या दिवशी प्रत्येकी ३५ पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्याआधीच्या सलग चार दिवसांतही प्रत्येकी ३५ पैसे वाढ करण्यात आली होती.
भारतातील सर्व प्रमुख शहरांतील पेट्रोलचा दर आता १०० रुपयांच्या वर गेला आहे. तसेच डझनभर राज्यांत डिझेलही शंभरीपार झाले आहे. श्रीनगर आणि चेन्नई यासारख्या काही शहरांत डिझेल शंभरीच्या उंबरठ्यावर आहे. श्रीनगरमध्ये डिझेल ९९.४९ रुपये लिटर, तर चेन्नईमध्ये ९९.९२ रुपये लिटर झाले आहे. प्रत्येक राज्यात स्थानिक कर भिन्न असल्यामुळे इंधनाचे दरही भिन्न आहेत.