महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ ऑक्टोबर । टी-२० वर्ल्डकप २०२१ च्या १६ व्या लढतीत रविवारी भारतीय संघ पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी भिडणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. विकोपाला गेलेल्या वादांमुळे उभय देशांत द्विपक्षीय मालिका होत नाही. केवळ आयसीसी व एसीसीच्या स्पर्धांमध्येच दोन्ही संघ समाेरासमोर येतात. वनडे व टी-२० अशा दोन्ही वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध भारत अजिंक्यच आहे. दोन्ही प्रकारांतील सर्व १२ सामने भारताने जिंकलेले आहेत. टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताने पाकला ५ वेळा धूळ चारली आहे. पैकी दोन सामन्यांत भारत प्रथम फलंदाजी करून, तर तीन लढतींत धावांचा पाठलाग करून जिंकलेला आहे.
दुबईत रविवारी कार्यदिवस असतो. मात्र सामना पाहण्यासाठी चाहत्यांनी सुटी टाकली आहे. अनेक क्रिकेटप्रेमींनी रेस्तराँत टेबल बुक केले आहे.काही रेस्तराँने स्पेशल मेन्यूही बनवला आहे. फूड डिलिव्हरी कंपन्यांनी घरात सामना पाहणाऱ्यांसाठी फ्री डिलिव्हरी देण्याची घोषणा केली आहे.
दोन्ही संघांदरम्यान गेल्या १० सामन्यांत भारताने ८, तर पाकने २ जिंकले. यात तीन टी-२० व ७ वनडेंचा समावेश आहे. पाकिस्तानने २०१४ मध्ये आशिया कपमध्ये १ गडी व २०१७ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीत १८० धावांनी विजय मिळवला होता. भारताने ५ सामने धावांचा पाठलाग करत जिंकले.
पाक मजबूत संघ आहे, मात्र आम्ही सर्वाेत्तम खेळ दाखवू. त्यांच्याकडे गेमचेंजर खेळाडू आहेत. आम्ही फक्त टीम प्लॅन व कॉम्बिनेशनवर भर देत आहोत. -विराट कोहली
आम्ही पूर्ण क्षमतेसोबत उतरू. रवाना होण्यापूर्वी आमच्या पंतप्रधानांची भेट घेतली. त्यांनी भारताविरुद्ध आक्रमक खेळण्याचा सल्ला दिला आहे. -बाबर आझम