महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ ऑक्टोबर । देशात शनिवारी पेट्रोल-डिझेलचे दर ३५ पैशांनी वाढले. महिन्यातील ही १८ वी दरवाढ आहे. यंदा १ जानेवारीपासून आजवर पेट्रोल २३.५३, तर डिझेल २१.८६ रुपयांनी महागले आहे. गेल्या २० वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकली असता एका वर्षात पेट्रोलमध्ये कधीही एवढी दरवाढ झाली नाही. १ जानेवारीला दिल्लीत पेट्रोल ८३.७१ रुपये होते, ते आता १०७.२४ रुपये झाले. म्हणजे, पेट्रोल २८% महागले आहे. देशात सर्वाधिक दर राजस्थानच्या श्रीगंगानगरात ११९ रुपये आहे. अांतरराष्ट्रीय बाजारात क्रूडच्या किमती ८५ डॉलर प्रतिबॅरलवर आहेत. तेलाच्या किमतींचे विश्लेषण करणाऱ्या अांतरराष्ट्रीय संस्थांनुसार, येत्या ३-४ महिन्यांत कच्च्या तेलाचे दर १०० डॉलर प्रतिबॅरलवर जाऊ शकतात. असे झाल्यास केंद्र व राज्य सरकारांवर करकपातीचा दबाव असेल. मात्र त्यांनी करकपात केली नाही तर पेट्रोलच्या दरांत १० रुपये प्रतिलिटरपर्यंत वाढ होऊ शकते.