महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ ऑक्टोबर । केंद्र शासनाने आयात खाद्यतेलावरील डयुटी कमी केल्याने, या आठवडयात खाद्यतेलाच्या दरात, किलोमागे चार रूपयांनी घसरण झाली आहे. गेल्या महीन्यापासून टप्प्या-टप्प्याने ही घसरण सुरू आहे. सद्या सरकी तेलाची मागणी जास्त आहे. गेल्या दिवाळीपासून खाद्यतेलाचा दर तेजीत असल्याने, वर्षंभरात हा दर दुप्पट झाला आहे. या वाढत्या दरावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने आयात शुल्कामध्ये कपात करण्यासाठी हालचाल सुरू होती. यानुसार केंद्र शासनाने सोयावरील ऍग्रो सेस 20 वरून 5 टक्के तर क्रूड पाम ऑईलवरील ऍग्रो सेस 20 वरून 7.5 टक्के केल्याने, गेल्या आठवडयापासून खाद्य तेलाच्या दरात कपात झाली आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर साठवणूकदार व होलसेल व्यापाऱयांनी खाद्यतेलाची मोठी खरेदी केली आहे. पण केंद्र शासनाने डयूटी कमी केल्याने, व्यापाऱयांना आता आपला माल विकण्यास अडचण येऊ लागली आहे. कारण त्यांनी खरेदी केलेल्या भावापेक्षा आता भाव कमी झाला आहे. गेल्या महीन्यापूर्वी खाद्यतेलाचा दर वाढूनच होता. गेल्या महीन्यातील दर, आठवडयापूर्वीचा दर व सद्यस्थितीचा आढावा घेतल्यास ही घसरण सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.