महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ ऑक्टोबर । इंधन दरवाढीमुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी येत्या काही दिवसात एसटी महामंडळ भाडेवाढ करण्याची शक्यता आहे. याबाबतचा प्रस्ताव एसटी महामंडळाने तयार केला असून त्याला लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
एसटी महामंडळाने २०१८ मध्ये १८ टक्के भाडेवाढ केली होती. त्यानंतर कोरोनामुळे कोणतीही भाडेवाढ केलेली नाही. एसटीचे दररोज २१ कोटींचे उत्पन्न कोरोनामुळे काही लाखांवर आले होते. सध्या ऑक्टोबरमध्ये हे उत्पन्न १२ कोटींपर्यंत आले आहे. पुरेसे उत्पन्न नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांना वेतनासाठी राज्य सरकारची मदत घ्यावी लागत आहे. एसटी महामंडळाच्या १५ ते १६ हजार बस डिझेलवर धावत आहेत. त्यापैकी सध्या १२ हजार गाड्या धावत आहेत. त्यासाठी दररोज ९.७७ लाख लिटर डिझेल लागते. एसटीच्या महसुलाच्या ३८ टक्के महसूल हा इंधनासाठी खर्च होत आहे, असे सूत्रांनी सांगितले.
२०१८ मध्ये एसटीची भाडेवाढ केली, तेव्हा डिझेल प्रतिलिटर ७२ रुपये होते. आता डिझेल १०४ रुपये प्रतिलिटर झाले आहे. तसेच कोरोनामुळे प्रवासी वाहतुकीवर परिणाम झाला आहे. उत्पन्नात मोठी घट झाल्याने एसटी महामंडळाने भाडेवाढीचा प्रस्ताव तयार केला होता. येत्या काही दिवसात त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.