महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ ऑक्टोबर । देशात काश्मीरमध्ये हिंदूंची कत्तल, तर दुसरीकडे लडाखमध्ये चिनी सैन्याने घुसखोरी केली असताना केंद्रातील भाजप सरकार लसीकरणाचा खोटा उत्सव साजरा करण्यात मग्न आहे. मात्र, देशात १०० कोटी लसीकरण झाल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दावा सपेशल खोटा असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे संपर्कनेते खासदार संजय राऊत यांनी केला. देशात २३ कोटी लोकांचेच लसीकरण झाले असून, त्याचे पुरावे आपण सिद्ध करू, असे आव्हान राऊत यांनी शनिवारी दिले. भाजपच्या १०० लोकांच्या घोटाळ्याच्या फायली शिवसेनेकडे तयार असल्याचा इशाराही राऊतांनी भाजपला दिला आहे.
महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई नाका परिसरातील दादासाहेब गायकवाड सभागृहात शिवसेनेचा संपर्क मेळावा झाला. मेळाव्यात खासदार राऊत यांनी भाजपवर जोरदार आसूड ओढले.
संजय राऊत हे शिवसेनेचे प्रवक्ते आहेत की शरद पवारांचे, अशी टीका करणाऱ्या किरीट सोमय्यांना राऊत यांनी सुनावले. ‘मी ठाकरे आणि शरद पवार या दोघांचाही प्रवक्ता आहे. पवार हे परगृहावरून आलेले नाहीत. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवारांना गुरू मानले आहे. त्याचे बोट धरून राजकारणात आल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. मला प्रश्न विचारणाऱ्या सोमय्या यांनी याविषयी माहिती घ्यावी,’ असा टोला राऊत यांनी हाणला.