महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ ऑक्टोबर । गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना विषाणूचा संसर्ग (Corona pandemic) नियंत्रणात आला आहे. व्यापक प्रमाणात कोरोना लसीकरण मोहीम (Corona vaccination) राबवल्याने देशात कोरोना रुग्णाचा संसर्ग नियंत्रणात आला आहे. एकट्या पुणे शहरात 50 लाखांपेक्षा अधिक जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचली आहे. यामध्ये 65 टक्के नागरिकांना मोफत लस देण्यात आली आहे. तर 35 टक्के लोकांना विकतची लस देण्यात आली आहे. यासाठी तब्बल 141 कोटी 26 लाख 53 हजार 15 रुपयांचा निधी खर्च करण्यात आल्याची माहिती महापालिकेकडून मिळाली आहे.
खरंतर, 16 जानेवारी 2021 पासून केंद्रसरकारने देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात केली होती. लस कोणाला द्यायची याबाबत सुरुवातीच्या काळात अनेक बंधणं होती. कोरोना प्रतिबंधक लस मिळवण्यासाठी नागरिकांना प्रचंड ओढाताण करावी लागली. 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्याची परवानगी दिल्यानंतर, लसीकरण केंद्रावर भल्या मोठ्या रांगा पाहायला मिळाल्या आहेत. केंद्र सरकारकडून मोजक्या प्रमाणात लशी वितरीत होत असल्याने कित्येक तास रांगेत उभं राहूनही लस मिळत नव्हती.
त्यामुळे अनेक नागरिक संताप्त व्यक्त करत होते. पण गेल्या काही काळापासून देशात कोरोना लशीचा मुबलक प्रमाणात पुरवठा होतं असून व्यापक स्तरावर लसीकरण मोहीम राबवली जात आहे. शनिवारी शहरात 22 हजार 399 जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. त्यामुळे सध्या पुण्यात लसीकरणाचा आकडा 50 लाख 20 हजार 78 वर पोहोचला आहे. शहरात आणखी 12 लाख डोसचं लसीकरण होणं अपेक्षित असून, यामध्ये दुसऱ्या डोसवर लक्ष केंद्रीत केलं जाणार आहे.
पुणे महानगर पालिकेनं जारी केलेल्या माहितीनुसार, 22 ऑक्टोबरपर्यंत पुण्यात 32 लाख 83 हजार 653 डोस मोफत दिले आहेत. तर उर्वरित 17 लाख 36 हजार 425 डोस खासगी रुग्णालयातून सशुल्क देण्यात आले आहे. या लसीकरण मोहीमेसाठी महापालिकेनं तब्बल 141 कोटी 26 लाख 53 हजार 15 रुपये खर्च केले आहेत.