महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ ऑक्टोबर । आगामी सामन्यात टीमला संघात तीन माेठे बदल हाेण्याचे चित्र आहे. यासाठी जायबंदी हार्दिकच्या जागी ईशान किशन, वरुण चक्रवर्तीच्या जागी अश्विन व भुवनेश्वरच्या जागी शार्दूलची निवड हाेऊ शकेल. हा बदल संघाला तारणारा ठरेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. यातून टीम ट्रॅकवर पुनरागमन करू शकेल.
सध्या जायबंदी हार्दिकची सुमार खेळी अधिकच चर्चेत आहे. संघ जाहीर झाल्यानंतरही हार्दिकच्या निवडीवर प्रचंड टीका करण्यात आली हाेती. त्यामुळे आता त्याला ब्रेक मिळण्याची शक्यता आहे. कारण त्याने पाकिस्तानविरुद्ध सामन्यापूर्वी पाच डावांत सुमार खेळी केली. यादरम्यान त्याची १७ ही सर्वाेत्तम अशी खेळी राहिली आहे. ईशानला आघाडीच्या फळीत फलंदाजीची संधी मिळू शकेल. त्याने गत तीन डावांत तीन अर्धशतके साजरी केली आहेत. त्यामुळे ताे वरच्या स्थानी फलंदाजी करण्यात सक्षम असल्याचे दिसून येते.
टीम इंडियाला विश्वचषकासाठी सरावाकडे दुर्लक्ष करणे चांगलेच महागात पडले. कारण संघातील खेळाडूंना टी-२० सामन्यांच्या अभावामुळे सराव करता आला नाही. यातून डावखुऱ्या गाेलंदाजाच्या माऱ्यापुढे आव्हान कायम ठेवण्यात भारताचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. याचाच फायदा घेत पाकचा २१ वर्षीय युवा गाेलंदाज शाहीन आफ्रिदी हा संघावर वरचढ ठरला. त्याने तीन महत्त्वाचे बळी घेऊन टीमला माेठा धक्का दिला. डावखुऱ्या गाेलंदाजांच्या चेंंडूवर राेहित शर्मा हा १३, सूर्यकुमार यादव १० आणि कर्णधार विराट काेहली ९ वेळा बाद झाले आहेत. हीच दुबळी बाजू लक्षात घेऊन पाक संघाने लेफ्ट आर्म पेसर आफ्रिदीला संधी दिली. याच संधीला सार्थकी लावताना आफ्रिदीने चार षटकांत ३१ धावा देत तीन महत्त्वाचे बळी घेतले. याशिवाय पाक टीमने पहिल्यांदाच विराट काेहलीची विकेट घेण्याचा पराक्रम गाजवला आहे. हे यशही आफ्रिदीने पाकिस्तान संघाला मिळवून दिले.
शार्दूलचा अनुभव ठरेल फायदेशीर : टीम इंडियाचा वेगवान गाेलंदाज भुवनेश्वर सध्या फाॅर्मात येण्यासाठी जिवाचे रान करत आहे. मात्र, त्याला अद्याप समाधानकारक कामगिरीचा सूर गवसलेला नाही. त्यामुळे शार्दूलची निवड संघाला तारणारी ठरेल. त्याची आतापर्यंतची कामगिरी सर्वाेत्तम ठरलेली आहे. ताे गत २ सत्रांमध्ये भारतीय संघाकडून सर्वाधिक बळी घेणारा गाेलंदाज ठरला. त्याने १४ डावांत २३ बळी घेण्याचा पराक्रम गाजवला आहे.