महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ ऑक्टोबर । अवघ्या दोन दिवसांच्या स्थिरतेनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली. त्यानुसार पेट्रोल प्रतिलीटर 35 पैसे तर डिझेल 37 पैशांनी महागले आहे. हे दर आज दिवसभरासाठी लागू राहतील. मात्र, यामुळे पेट्रोल, डिझेलच्या किंमतीचा प्रवास पुन्हा एकदा वरच्या दिशेने सुरु झाला आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. यापूर्वी 25 ऑक्टोबर आणि 26 ऑक्टोबरला देशभरात इंधनाचे दर स्थिर होते.
पेट्रोलियम कंपन्यांनी बुधवारी जाहीर केलेल्या दरांनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 113.80 रुपये इतका आहे. तर डिझेलचा प्रतिलीटर दर 104.75 रुपये इतका आहे. तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 107.94 आणि 96.67 रुपये इतका आहे. इंधनाची दरवाढ अशीच सुरु राहिल्यास पेट्रोल लवकरच 120 रुपये प्रतिलीटरचा टप्पा गाठेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाचा दर प्रतिबॅरल 86 डॉलर्सपर्यंत पोहोचला होता. तो आता 85 डॉलर्सच्या खाली आला आहे. त्यामुळे भारतात इंधन स्वस्त होण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, भारतीय पेट्रोलियम कंपन्यांकडून अद्याप इंधनदरात कपात करण्यात आलेली नाही.
भारतात इंधनदरात प्रचंड वाढ
देशातील इंधनाच्या किमती गेल्या 15 महिन्यांत 35 टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे भविष्यात देशात जास्त मायलेज देणाऱ्या 10 लाख रुपयांपेक्षा कमी श्रेणीती गाड्यांची मागणी वाढू शकते, असे एचएसबीसी ग्लोबल रिसर्चच्या अहवालात म्हटले आहे.