पिंपरी-चिंचवडमध्ये भररस्त्यात बसने घेतला पेट; चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले ३० प्रवाशांचे प्राण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ ऑक्टोबर ।पिंपरी-चिंचवडमध्ये पीएमपीएमएल बसने पेट घेतल्याची घटना घडली आहे. चालकाने प्रसंगावधान दाखवल्याने बसमधील ३० प्रवाशांचे प्राण वाचले आहेत अशी माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे. पिंपळे गुरव येथून पुण्याच्या दिशेने बस जात होती. तेव्हा, दापोडी पुलावर येताच बसमधून अचानक धूर येत असल्याने बस थांबविण्यात आली आणि प्रवाशांना तातडीने खाली उतरवले. त्यानंतर काही क्षणातच बसने पेट घेतला.

पिंपळे गुरव येथून पीएमपीएमएल बस क्रमांक (MH-12, HB- 1438 CNG) ही पुण्याच्या दिशेने जात होती. मात्र, दापोडी पुलावर येताच इंजिनमध्ये शॉर्टसर्किट होऊन धूर येत असल्याने बस चालक लक्ष्मण हजारे यांनी बस बाजूला घेऊन थांबवली. तातडीने वाहक आणि चालक हजारे यांनी प्रवाशांना खाली उतरवले. दरम्यान, काही क्षणातच बसमधून धुरांचे मोठे लोट येऊ लागले आणि बसने पेट घेतला.

ही घटना आज सकाळी पावणे अकराच्या सुमारास घडली असून पिंपरी, रहाटणी येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनस्थळी येऊन आग आटोक्यात आणली. पुणे आणि पिंपळे गुरव या दोन्ही दिशेने काही वेळ वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अशी माहिती अग्निशमन दलाच्या विभागाने दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *