महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ ऑक्टोबर । दोन दिवसांपूर्वी संपूर्ण देशातून मान्सूनने माघार घेतली आहे. यानंतर महाराष्ट्रासह देशात किमान तापमानात (Temperature in Maharashtra) काही अंशी घट झाली आहे. राज्यात पुढील चार दिवस कोरडं हवामान (Dry weather) राहणार असून कोकणात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळू शकतील, असा अंदाज हवामान खात्याकडून (IMD) व्यक्त करण्यात आला आहे. सध्या राज्यात दुपारी उकाडा आणि पहाटे थंडी असं संमिश्र वातावरण पाहायला मिळत आहे. पुढील काही दिवस राज्यात हीच स्थिती कायम राहणार असून थंडीत किंचित वाढ होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, देशातून मान्सूनने माघार घेताच पुण्यात किमान तापमानाचा (Temperature in pune) पारा घटला आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात पहाटे वातावरणात थंडी वाढताना दिसत आहे. आज पुण्यात अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा 15 अंश सेल्सिअसच्या खाली गेला होता. आज पुण्यात एनडीए परिसरात सर्वात कमी 14 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ, माळीण (14.4), पाषाण (14.6) आणि हवेली (14.9) अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. उर्ववरित पुणे परिसरात किमान तापमान 15 ते 21 अंश सेल्सिअस दरम्यान नोंदलं आहे.