After Recovering Dengue : डेंग्यूमधून बरे झाल्यानंतरही बराच काळ जाणवतात या समस्या; असा करा उपाय

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ ऑक्टोबर । भारतात अनेक राज्यांमध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. गेल्या काही वर्षांत डेंग्यू हा आजार जगभरात अनेक ठिकाणी हातपाय पसरतो आहे. या जीवघेण्या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अजूनही चांगली असली तरी, डेंग्यूमधून बरे झाल्यानंतरही अशा व्यक्तींनी आपल्या आरोग्याबाबत सतर्क राहण्याची गरज असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. हिंदुस्थान वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, डेंग्यूविरुद्धचे युद्ध केवळ या संसर्गापासून बचाव किंवा बरे होण्यापुरते मर्यादित नाही. कारण साधा ताप येतो आणि जातो, पण डेंग्यू बरा झाल्यानंतरही हा त्रास बराच काळ कायम राहतो. डेंग्यूमुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम हे बरेच काळ राहू शकतात, त्यामुळे लोकांनी पौष्टिक आहार आणि नियमित दिनचर्या अंगीकारण्यावर भर (Be Alert After Recovering From Dengue) द्यावा.

या बातमीत, सफदरजंग हॉस्पिटल, दिल्लीच्या सामुदायिक औषध विभागाचे प्रमुख डॉ. जुगल किशोर म्हणाले, “डेंग्यूमधून बरे झाल्यानंतर, दोन आठवडे विश्रांती घेणं आवश्यक आहे. संतुलित आहार, पुरेसे पाणी प्या. ताण अजिबात घेऊ नका. हळूहळू जुन्या जीवनशैलीकडे परत या. लगेच कामाला सुरुवात करू नका.”

डेंग्युतून बरे झाल्यानंतर

शरीरात वेदना

डेंग्यूच्या रुग्णांमध्ये स्नायू दुखणे ही सर्वात सामान्य गोष्ट आहे. परंतु, डेंग्यूतून बरे झाल्यानंतरही बराच काळ ही समस्या टिकू शकते.

केस गळणे

डेंग्यूचा रुग्णाच्या केसांच्या फोलिकल्सवर परिणाम होतो. त्यामुळे केसगळतीची समस्याही अनेक रुग्णांमध्ये दिसून येत आहे.

व्हिटॅमिन-खनिजांची कमतरता

डेंग्यूच्या रुग्णांमध्ये जीवनसत्त्वे A, D, B12, E यासह अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजांची कमतरता असते. यामुळे सांधेदुखीचा त्रास आणखी वाढतो. काही लोकांमध्ये त्वचेशी संबंधित समस्या देखील दिसून येतात.

अशक्तपणा

प्लेटलेट्सच्या कमतरतेमुळे रुग्ण बरे झाल्यानंतरही अशक्त वाटतात. ज्यांची प्रतिकारशक्ती कमी असते अशा लोकांना अधिक अशक्तपणाचा सामना करावा लागतो. विशेषत: मुले आणि वृद्धांना बरे झाल्यानंतर बराच काळ त्रास होऊ शकतो.

नैराश्य

इंटरनॅशनल जर्नल ऑफ मेंटल हेल्थ सिस्टीममध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, डेंग्यू तापाने ग्रस्त लोकांमध्ये तणाव, नैराश्य आणि चिंता यांचे प्रमाण वाढले आहे. डेंग्यूनंतरही काही काळ ही समस्या कायम राहू शकते.

डेंग्यूपासून बरे झाल्यानंतर काय करावे

संतुलित आहारासोबत काही दिवस लिंबूपाणी आणि ओआरएस द्रावण घेत राहा.

रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी डाळिंब, संत्री आणि उसाचा रस पिणे आवश्यक आहे.

अंडी, चिकन आणि मासे खाणे फायदेशीर आहे.

 

काय करू नये

मच्छरदाणी घातल्याशिवाय झोपू नका, यामुळे संसर्ग टाळण्यास मदत होईल.

डेंग्यू पुन्हा होऊ शकत नाही असे समजू नका, हा केवळ भ्रम आहे.

जड व्यायाम किंवा जड काम करू नका. जंक फूड अजिबात खाऊ नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *