महागाईचा आगडोंब ; एसटी प्रवास महागल्याने प्रवाशांमध्ये नाराजी

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ ऑक्टोबर । एकीकडे इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर महागाईचा आगडोंब उसळलेला असतानाच त्यात आता राज्य मार्ग परिवहनचा बस प्रवासही महागल्याने सर्वसामान्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटीची भाडेवाढ झाली असून सोमवारी मध्यरात्रीपासून महामंळाने तीन वर्षानंतर १७ टक्के भाडेवाढ लागू केली. त्यामुळे मंगळवारी सकाळी नित्यनियमाने एसटी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा झटका बसला.

इंधनाची दरवाढ तसेच गाड्यांच्या सुट्या भागाच्या वाढलेल्या किंमतीचे कारण देत महामंडळाच्या तिजोरीवर पडलेला भार कमी करण्यासाठी एसटीची भाडेवाढ लागू केली आहे.

मनमाड हे राज्यातील प्रमुख रस्ता आणि रेल्वे वाहतुकीचे मध्यवर्ती केंद्र असल्याने राज्याच्या विविध भागातून परराज्यातूनही प्रवासी मोठ्या संख्येने मनमाड रेल्वे स्थानकात येतात आणि येथून आपल्या नियोजित प्रवासाला मार्गस्थ होतात. त्यासाठी सामान्य प्रवाशांना एसटीचा आधार असतो. परंतु, आता हा प्रवासही महागला असल्याने महिनाभराच्या प्रवास खर्चाचे अंदाजपत्रक कोलमडले आहे.

संख्येने राज्याच्या विविध भागात प्रवासी प्रवास करतात. यापूर्वी मनमाड ते नांदगाव ३५ रुपये भाडे होते. ते आता ४० रुपये झाले आहे. मालेगाव येथे जाण्यासाठी ४५ ऐवजी ५५ रुपये लागणार आहेत. चांदवडसाठी ३० ऐवजी ३५ रुपये तर नाशिकसाठी ११५ ऐवजी १३० रुपये लागणार आहेत मनमाड-शिर्डी हा प्रवास पूर्वी ७५ रुपयांत होत असे, आता तो ९० रुपयांवर गेला आहे. अनेक नागरिक विविध कामासाठी मनमाड ते पुणे नियमित प्रवास करत असतात. या प्रवाशांना मनमाड ते पुणे ३३० रुपये तिकीट होते ते आता ३८५ रुपये इतके झाले आहे. मनमाड ते अहमदनगर १८० वरून २१० रुपये तर, मनमाड-धुळे प्रवासासाठी आता १०५ ऐवजी १२५ रुपये मोजावे लागतील. एसटी प्रवासात किमान पाच रुपयांची वाढ जाहीर केली असली तरी प्रत्यक्षात ती अनेक पटीने जास्त आहे. मनमाड ते पुणे प्रवासासाठी यापूर्वी ३३० रुपये लागत होते ते आता ३८५ रुपये मोजावे लागणार आहेत. दरम्यान ऐन सणासुदीच्या दिवसांत दरवाढ करणे गरजेचे नव्हते, अशी प्रतिक्रिया मनमाड परिसरातील निवृत्त शिक्षक रामलाल ठाकरे यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *