महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ ऑक्टोबर । राहुरी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ३५ व्या दीक्षांत समारंभात ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानद पदवी प्रदान प्रसंगी कुलपती तथा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. (35th convocation ceremony of mahatma phule agricultural university)
या प्रसंगी कृषी क्षेत्रातील स्नातकांनी संशोधन कार्यात भाग घ्यावा, आपल्या संशोधनातून देशाचे भले करू असा संकल्प करावा. अशी अपेक्षा व्यक्त करून, येत्या पाच-सहा वर्षात कृषी अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम मराठी मातृभाषेत करण्याचा प्रयत्न असल्याचे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सांगितले.राहुरी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ३५ व्या दीक्षांत समारंभात कुलपती कोश्यारी बोलत होते. प्रति कुलपती तथा कृषीमंत्री दादा भुसे, माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार, रस्ते बांधकाम व वाहतूक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, अधिष्ठाता (कृषी) डॉ. प्रमोद रसाळ, महाराणा प्रताप कृषी व अभियांत्रिकी विद्यापीठ, उदयपुर (राजस्थान) कुलगुरु नरेंद्रसिंग राठोड उपस्थित होते.
राज्यपाल कोश्यारी म्हणाले, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे “अन्नं बहु कुर्वीत तद् व्रतम” हे ब्रीदवाक्य केवळ दिखाव्यासाठी नको. ही प्रतिज्ञा व्यवहारात आणली पाहिजे. तसा प्रयत्न प्राध्यापक करीत आहेत. विद्यापीठाचे कार्य प्रेरणादायी आहे. पंतप्रधान मोदींचे स्वप्न साकार होतेय. याचे समाधान आहे. कोरोनाच्या जागतिक महामारीत शेतकऱ्यांनी जनतेला अन्नधान्य पुरवून जिवंत ठेवले. शेतकऱ्यांनी निर्यातक्षम उत्कृष्ट शेतमाल तयार करावा. शेतमालाचे जास्तीत जास्त पेटंट केल्यास, निर्यातीतून चौपट उत्पन्न मिळेल. शेतकरी सुखी होईल. आत्महत्या होणार नाहीत.”