महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ ऑक्टोबर । देशातील कोरोना (Coronavirus) रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे आता हळूहळू देश पुन्हा अनलॉक होतो आहे. यामुळे यावर्षी तरी दिवाळी कोरोना येण्याच्या आधीप्रमाणे साजरी करता यावी अशी आशा लोकांना होती. मात्र कोरोनाचा डेल्टा व्हेरियंटचा आणखी एक सबव्हेरियंट आढळून आला आहे. यासोबतच, डेल्टा व्हेरिएंट पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींमार्फतही पसरू शकतो असं ब्रिटनमधील एका संशोधनात समोर आलं आहे. त्यामुळे, यंदाच्या दिवाळीत निर्बंध शिथील असले, तरी लोकांनी स्वतःच खबरदारी बाळगावी असे मत प्राध्यापक एम. सी. मिश्रा यांनी व्यक्त केले. ते दिल्लीतील एम्सचे माजी संचालक (Former AIIMS director) आणि आरोग्य तज्ज्ञ आहेत. आकाशवाणीला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी कोविड, सण आणि डेंग्यूबाबत काही प्रश्नांची उत्तरे दिली.
डॉ. मिश्रा म्हणाले, “सध्या सणांचा काळ सुरू आहे. नवरात्री, दसरा पार पडला आहे. विशेष म्हणजे, हे दोन्ही सण लोकांच्या सहकार्यामुळे उत्तमरित्या पार पडले. आता जी परिस्थिती सुधारताना दिसत आहे, त्याला आपले हे सहकार्यच जबाबदार आहे. आता दिवाळीलादेखील लोकांकडून अशीच खबरदारी (Precautions during Diwali) बाळगणे अपेक्षित आहे. देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली, तरी गेल्या वर्षी आपण ज्याप्रकारे खबरदारी घेत होतो, त्याचप्रमाणे आताही घेणे गरजेचे आहे. लोकांच्या भेटी-गाठी टाळायला हव्यात. यासोबत कोविड नियमांचे (Covid protocols) पालनही आवश्यक आहे. फिजिकल डिस्टन्सिंग (Physical distancing), मास्कचा (Mask) वापर याचे फायदे आपण पाहिलेच आहेत. याच्या वापरामुळे टीबीचे रुग्ण कमी झालेले आपण पाहिले आहेत. तसेच, इतर व्हायरल संसर्गाचे रूग्णही कमी झाले आहेत. मास्कमुळे आपण हवेच्या प्रदूषणापासूनही (Air pollution) स्वतःचा बचाव करू शकतो”
“यावर्षी कोरोनासोबतच डेंग्यूचीही साथ (Dengue in India) आपल्याला मोठ्या प्रमाणात पहायला मिळाली. नुकताच पावसाळा संपला आहे. त्यामुळे मच्छरांची मोठ्या प्रमाणात पैदास झालेली असणार आहे. डेंग्यूच्या चार प्रकारांपैकी सध्या देशात डेंग्यू-2 या प्रकाराची साथ (Dengue type 2) दिसून येत आहे. हा प्रकार अधिक घातक असतो. त्यामुळे या हिवाळ्यात कोरोनासोबतच आपल्याला डेंग्यूपासूनही स्वतःचा बचाव करायचा आहे”, असं मिश्रा यांनी मुलाखतीत म्हटलं.
दरम्यान, मिश्रा यांनी देशातील केंद्र सरकार ज्याप्रमाणे देशातील कोरोना परिस्थिती हाताळत आहे त्यावर समाधान व्यक्त केले. पंतप्रधान मोदींनी या संकटकाळात ज्याप्रमाणे देशाचे नेतृत्व केले, ते एक अनन्यसाधारण उदाहरण असल्याचे मिश्रा म्हणाले. यासोबतच, “आपल्या देशातील आरोग्य व्यवस्था आता अधिक बळकट झाली आहे. कोरोना संक्रमण दर असो वा मृत्यूदर, दोन्हीमध्ये आपला देश इतर देशांच्या तुलनेत अधिक चांगल्या स्थितीत आहे. या गोष्टीचा आपल्याला अभिमान असायला हवा”, असंही ते म्हणाले. एकूणच देशातील कोरोना परिस्थिती सुधारत असली, तरी त्यात सातत्य राखण्यासाठी आपल्याला सणांमध्ये अधिक खबरदारी बाळगणे गरजेचे आहे. तसेच, कोरोनासोबत डेंग्यूपासून बचाव करणेही आवश्यक आहे.