महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ ऑक्टोबर । भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात रविवारी होणाऱ्या मॅचमध्ये सर्वाधिक दबाव टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीवर (Virat Kohli) असणार आहे. पाकिस्तान विरुद्ध पराभूत झाल्यानं टीम इंडिया सध्या दबावात आहे. न्यूझीलंड विरुद्धची मॅच गमावली तर टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) आव्हान संपुष्टात येण्याचा धोका भारतीय क्रिकेट टीमसमोर आहे. त्यामुळे विराट कोहलीच्या कॅप्टनसीची मोठी परीक्षा रविवारच्या मॅचमध्ये होणार आहे.
टी20 वर्ल्ड कपच्या इतिहासात न्यूझीलंडचं टीम इंडियावर एकतर्फी वर्चस्व आहे. भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही टीम 2007 आणि 2016 सालच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये आमने-सामने होत्या, या दोन्ही सामन्यांमध्ये टीम इंडियाला पराभव स्वीकारावा लागला होता.
पहिल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये म्हणजे 2007 साली जोहान्सबर्गमध्ये टीम इंडियाचा 10 रननं पराभव झाला होता. त्यानंतर 2016 साली नागपूरमध्ये 127रनचा पाठलाग करताना भारतीय क्रिकेट टीम फक्त 79 रनवर ऑल आऊट झाली होती. हा टी20 वर्ल्ड कपमधील भारताचा सर्वात कमी स्कोअर आहे.
टी20 क्रिकेटमधील रेकॉर्ड पाहिला तर 2016 पर्यंत भारतीय टीमला न्यूझीलंड विरुद्ध एकही मॅच जिंकता आलेली नव्हती. पण, मागच्या 5 वर्षांमध्ये हे चित्र बदललं आहे. मागच्या 11 पैकी 8 मॅच टीम इंडियानं जिंकल्या आहेत. एकूण रेकॉर्डचा विचार केला तर दोन्ही देशांमध्ये 16 टी20 झाल्या आहेत. यामध्ये न्यूझीलंडनं 8 वेळा तर टीम इंडियानं 6 वेळा विजय मिळवला आहे. दोन मॅच टाय झाल्या असून त्याचा निर्णय सुपर ओव्हरमध्ये लागला आहे.
अलिकडील काही वर्षांमध्ये झालेल्या मोठ्या मॅचमध्ये न्यूझीलंडचं पारडं जड आहे. 2019 साली झालेल्या वन-डे वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडनं 18 रननं विजय मिळवला आहे. तर यावर्षी जून महिन्यात झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या फायनलमध्येही टीम इंडिया न्यूझीलंडकडून 8 विकेट्सनं पराभूत झाली होती. विराट कोहलीसमोर आता हा इतिहास बदलण्याचं आव्हान आहे.