अजित पवारांकडून आमदारांच्या २८८ वाहन चालकांना मोठं गिफ्ट, मिळणार… वाहन चालकांच्या पगारात वाढ करण्याचं विधेयक लवकरच

Spread the love

महाराष्ट्र 24 – मुंबई:
राज्यात २८८ आमदार आहेत. प्रत्येक आमदाराला त्याच्या दौऱ्यांसाठी सरकारकडून गाडी दिली जाते. प्रत्येक आमदारांसोबत त्यांच्या गाडीवर एक ड्रायव्हरही दिला जातो. आता या वाहन चालकांच्या पगारात वाढ करण्याचं विधेयक लवकरच आणणार असल्याचं आश्वासन अजित पवार यांनी दिलंय.

आमदारांच्या येण्या-जाण्याची, त्यांना सुखरूपपणे कुठेही पोहोचवण्याची जबाबदारीही या वाहनचालकाची असते. आमदारांचे दौरेही बरेच लांब असतात. त्यामुळे त्यांचे ड्रायव्हर खूप मेहनत घेत असतात. मात्र त्यांना पुरेसं वेतन मिळत नाही. मात्र आता राज्य सरकारकडून या वाहन चालकांना वेतनवाढीचं मोठं गिफ्ट मिळणार आहे. आमदारांच्या गाडीवर असणाऱ्या वाहन चालकांच्या वेतनात वाढ करण्याची मागणी आज भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केली. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी औचित्याच्या मुद्दयाद्वारे हा प्रश्न उपस्थित केला.
या प्रश्नाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दखल घेतली आहे. यासंबंधीचं विधेयक लवकरच आणण्यात येईल आणि ते लगेच मंजूर करण्यात येईल असं आश्वासन अजित पवारांनी दिलंय.

मात्र आता या सगळ्याचा भार सरकारच्या तिजोरीवर पडणार का हा मोठा प्रश्न आहे. सध्या आमदारांना सरकारकडून २ स्वीय सहाय्यक देण्यात येतात. या स्वीय सहाय्यकांना १५ हजार आणि १० हजार असं वेतन देण्यात येतं. त्यात आमदारांच्या लँडलाईनचं बिलही राज्य सरकारकडूनच भरण्यात येतं. आमदारांना त्यांच्या दौऱ्यासाठी वाहन भत्ता आणि प्रवास भत्ताही दिला जातो. हा सगळा खर्च तब्बल ५० हजारांच्या घरात जातो. त्यात आता वाहनचालकांच्या वेतनवाढीचा अतिरिक्त भार राज्यसरकारच्या तिजोरीवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या २८८ आमदारांच्या २८८ वाहन चालकांना कधी वेतनवाढ मिळते हेच बघणं महत्वाचं असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *