कोरोना व्हायरसचा शेअर मार्केटवरही परिणाम – सेन्सेक्स, निफ्टीत पुन्हा घसरण

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 – मुंबई :
भारतात २८ जणांना करोना विषाणूची लागण झाल्याचे जाहीर होताच भांडवली बाजारावर बुधवारी पुन्हा चिंतेचे सावट दिसून आले. सलग सात व्यवहारांतील घसरणीनंतर मंगळवारी सावरलेले सेन्सेक्स तसेच निफ्टी निर्देशांक परिणामी काही प्रमाणात घसरले. सत्रात ९४५ अंशांपर्यंत उसळी घेणारा, सेन्सेक्स २१४.२२ अंश घसरणीने ३८,४०९.४८ पर्यंत खाली येऊन ठेपला. तर निफ्टी निर्देशांक ५२.३० अंश घसरणीसह ११,२५१ वर स्थिरावला. दोन्ही निर्देशांक मंगळवारच्या तुलनेत अध्र्या टक्क्यांनी खाली आले.

सेन्सेक्समध्ये बँक क्षेत्रातील इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक, स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक यांचे मूल्य सर्वाधिक, जवळपास ४ टक्क्यांनी आपटले. त्याचबरोबर बजाज फायनान्स, आयटीसी, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा स्टीलही घसरले. मुंबई निर्देशांकातील तेजीच्या यादीत सन फार्मा जवळपास ३ टक्क्यांसह अग्रणी राहिला. तसेच एशियन पेंट्स, टेक मिहद्र, महिंद्र अँड महिंद्र यांचेही मूल्य वाढले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये अर्थातच बँक, वित्त, पोलाद, स्थावर मालमत्ता, तेल व वायू, वाहन निर्देशांक सर्वाधिक घसरले. तर माहिती तंत्रज्ञान, आरोग्यनिगा निर्देशांक वाढले. मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप निर्देशांक प्रत्येकी दीड टक्क्याहून अधिक प्रमाणात घसरले.

जगभरात करोना विषाणूंच्या बळींची संख्या फोफावल्याने गेल्या काही सलग व्यवहारांपासून घसरण नोंदविणारे जागतिक भांडवली बाजारांचे प्रमुख निर्देशांकही बुधवारी वाढले. अमेरिकेच्या फेडरल रिझव्‍‌र्हने व्याजदरात केलेल्या कपातीमुळे सकाळच्या सत्रात आशियाई तर भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी सुरू झालेल्या अमेरिकेच्या बाजारात तेजी होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *