तापमानातील चढउतारामुळे पुणेकर हैराण

Spread the love

महाराष्ट्र 24 – मुंबई :
कर्नाटक किनारपट्टी ते नैॡत्य मध्य प्रदेश या दरम्यान चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी गेल्या दोन दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला होता. काही ठिकाणी गारपीटही झाली होती. त्याचा परिणाम पुण्यातील हवामानावर झाला. त्यातून कमाल तापमानाचा पारा सातत्याने कमी होत असल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली.

पुण्यात २६ फेब्रुवारीला कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा २.५ अंश सेल्सिअने कमी होऊन ३०.८ अंश सेल्सिअस नोंदला गेला. त्यानंतर अवघ्या चोवीस तासांमध्ये पारा ३.३ अंश सेल्सिअसने उसळी मारून ३४.१ अंश सेल्सिअसवर पोचला. त्यानंतर पुढील तीन दिवस सातत्याने दिवसाचे तापमान कमी होत गेले. मंगळवारपर्यंत ते ३१.७ अंश सेल्सिअसपर्यंत कमी झाले होते, अशी माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली.

पुढील दोन दिवसांमध्ये शहर आणि परिसरात आकाश निरभ्र राहणार असून, ३१ अंश सेल्सिअसपर्यंत कमी झालेला कमाल तापमानाचा पारा ३४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल, असा अंदाजही हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे.

विदर्भात वादळी पावसाचा अंदाज
राज्यात उन्हाचा चटका वाढला असतानाच सातत्याने पावसाला पोषक हवामानही होत आहे. विदर्भात येत्या गुरुवारपासून (ता. ५) वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा इशाराही देण्यात आला आहे. राज्याचे कमाल आणि किमान तापमान कमी-जास्त होणार असल्याची शक्‍यताही हवामान विभागाने वर्तविली आहे. राज्यात ढगाळ हवामान होत असून, उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ झाली आहे. किमान तापमान मात्र सातत्याने कमी अधिक होत आहे. राज्यात सर्वाधिक तापमान मालेगाव येथे ३६.६ अंश सेल्सिअस, तर नीचांकी तापमान नगर येथे १३.१ अंश सेल्सिअस नोंदले गेले. महाराष्ट्रात असलेला हवेचा कमी दाबाचा पट्टा मंगळवारी विरून गेला होता.

लहान मुलांसह ज्येष्ठांना त्रास
सकाळी अचानक पडणारी थंडी आणि दिवसभर उन्हाचा चटका, अशा हवामानाच्या लहरीपणामुळे पुणेकर हैराण झाले आहेत. त्याचा थेट परिणाम आरोग्यावर होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. हवामानात वेगाने झालेल्या बदलांमुळे सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, डोकेदुखीने पुणेकर त्रस्त झाले आहेत. त्याचा सगळ्यात मोठा फटका लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे, असे निरीक्षण कोलंबिया एशिया रुग्णालयाचे डॉ. वैभव पंधरकर यांनी नोंदविले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *