आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण – नवे सरकार, नवी पुस्तके, नवा अभ्यासक्रम

Spread the love

महाराष्ट्र 24 -मुंबई :

‘नवे शासन, नवा अभ्यासक्रम, नवी पुस्तके’ अशी प्रथा कायम राखत या शासनानेही पुढील वर्षांपासून पहिलीपासून पाठय़पुस्तके बदलण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीच्या सरकारने राज्यमंडळाची पुस्तके बदलण्याबरोबरच राज्याचे स्वतंत्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ स्थापन केले. स्थापनेपासून अभ्यासक्रमापर्यंत सर्वच बाबतीत हे मंडळ वादग्रस्त ठरले. आंतरराष्ट्रीय मंडळ बंद केल्यानंतर आता राज्यमंडळाचीच पाठय़पुस्तके आंतरराष्ट्रीय दर्जाची करण्याचे शासनाने जाहीर केले आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षां गायकवाड यांनी याबाबत पत्र काढले आहे.

गेल्याच वर्षी बदललेली पहिलीची पुस्तके आता पुढील शैक्षणिक वर्षी (२०२१-२२) पुन्हा बदलणार आहेत. महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ (एमआयईबी) बंद केल्यानंतर आता शिक्षण विभागाने सर्वच शाळांचा अभ्यासक्रम आंतरराष्ट्रीय दर्जाचा करण्याचे जाहीर केले असून त्यानुसार पुस्तके बदलण्यात येणार आहेत. दरम्यान सध्या ‘एमआयईबी’शी संलग्न असलेल्या शाळांसाठी पाचवीची पुस्तके यंदाच बदलण्यात येणार आहेत.

दरम्यान राज्यात यापुढे एकच शिक्षण मंडळ कार्यरत राहील. राज्यातील आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ बंद करण्यात आले असले तरी त्याच्याशी संलग्न शाळा या राज्यमंडळाच्या आखत्यारित सुरूच राहणार आहेत. राज्यात ६६ हजार ३३ शाळांपैकी ८१ शाळा आंतरराष्ट्रीय मंडळाशी संलग्न करण्यात आल्या होत्या. या शाळा बंद होणार नाहीत, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *