महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ नोव्हेबर । राज्यातील एसटी महामंडळाचे कर्मचारी गेल्या काही दिवसांपासून आपल्या काही मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनी संप केल्यामुळे राज्य सरकारने त्यापैकी काही मागण्या मान्यही केल्या. पण आता कर्मचाऱ्यांनी आपला राज्य सरकारमध्ये समावेश करुन घेण्यासंदर्भातील मागणी केली आहे. या कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.
"एस.टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी उपोषण किंवा आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्ती वा अन्य कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये. अन्यथा, कर्मचारी- कामगारांमधील असंतोषाचा उद्रेक होईल."
मा. मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी. pic.twitter.com/OLaMXcXDMS
— Raj Thackeray (@RajThackeray) November 4, 2021
राज्य शासनात एस.टी. महामंडळाचे विलीनीकरणाच्या मागणीसाठी उपोषण किंवा आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्ती वा अन्य कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये, अशी मागणी राज ठाकरे यांनी या पत्राद्वारे केली आहे. अद्याप राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी मान्य करण्याबाबत काहीही ठोस आश्वासने देण्यात आलेली नाहीत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावण आहे. या आंदोलन अथवा संपात सहभागी झालेल्या कोणत्याही कर्मचाऱ्यावर जर कारवाई झाली तर कर्मचारी- कामगारांमधील असंतोषाचा उद्रेक होईल, असे राज ठाकरे यांनी पत्राद्वारे स्पष्ट केले आहे.