![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ नोव्हेबर । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 वर्षांपूर्वी 8 नोव्हेंबर 2016 रोजी रात्री 8 वाजता नोटाबंदीची घोषणा करून संपूर्ण देशाला मोठा धक्का दिला होता. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच नोटाबंदीची घोषणा तात्काळ आणि गुप्तपणे करण्यात आली होती. नोटाबंदी जाहीर करत नरेंद्र मोदींनी 500 रुपये आणि एक हजार रुपयाच्या नोटा चलनात राहणार नसल्याचं जाहीर केलं. संपूर्ण देशाला नोटा बदलून घेण्यासाठी रांगेत उभं राहावं लागलं होतं. मात्र, नोटांबदी जाहीर करताना ज्या हेतूनं करण्यात आली तो हेतू यशस्वी झाला का प्रश्न कायम आहे. कारण, नागरिकांच्या हातात सर्वाधिक रोकड असल्याच्या बातम्या नुकत्याच प्रसिद्ध झाल्या आहेत.
नोटाबंदी करताना तीन कारणं
नरेंद्र मोदींनी 500 रुपये आणि 1000 हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. काळा पैसा, भ्रष्टाचार आणि दहशतवादी कारवाया थांबवणं हा मुख्य हेतू असल्याचं त्यावेळी सांगण्यात आलं होतं. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने अनेक कठोर निर्णय घेतले. यामध्ये नोटाबंदी हा ऐतिहासिक निर्णय होता. बाजारातून रोख रक्कम म्हणजेच नोटा कमी करणं हा देखील नोटाबंदीचा एक उद्देश होता. मात्र, इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार भारतीय जनतेकडे सर्वाधिक रोकड सध्याच्या घडीला आहे.
नोटा बदलण्यासाठी 50 दिवसांची मुदत
नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी जाहीर करताना 500 आणि 1 हजार रुपयांची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय दिला. नोटाबंदी केल्यानंतर नागरिकांना नोटाबदलून घेण्यासाठी 50 दिवसांची मुदत देण्यात आली होती. नरेंद्र मोदींनी घोषणा केल्यानंतर देशभरात एटीएमवर, बँकांमध्ये, पेट्रोल पंपावर नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. नोटा बदलून घेण्यासाठी रागेंत उभं राहिलेल्या नागरिकांना जीव देखील गमवावा लागला होता.
रोकड वाढली
इंडियन एक्स्प्रेसच्या एका रिपोर्टनुसार 4 नोव्हेंबर 2016 रोजी लोकांकडे 17.97 लाख कोटी रुपये रोख स्वरुपात होते. आता 8 ऑक्टोबर 2021 रोजी संपलेल्या पंधरवड्यात 5 वर्षानंतर ते 57.48 टक्के म्हणजे 10.33 लाख कोटी रुपयांनी वाढून 28.30 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचलीय. याचा अर्थ 5 वर्षात रोकड कमी झाली नसून वाढली आहे. 25 नोव्हेंबर 2016 पर्यंत लोकांकडे 9.11 लाख कोटी रुपयांची रोकड होती, त्यामध्ये 211 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
दहशतवादी कारवाया सुरुच
नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी करताना दहशतवादी कारवाया रोखणं हा देखील प्रमुख उद्देश असल्याचं म्हटलं होतं. नोटाबंदीनंतर पुलवामा दहशतवादी हल्ला या सारख्या भारताला हादरवणाऱ्या घटना घडल्या. काश्मीरमध्ये छोट्या मोठ्या दहशतवादी कारवाया सुरु असल्यानं विरोधी पक्षांकडून नोटाबंदीला यश किती आलं यासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येतं.