Zydus Cadila Vaccine : किंमत निश्चित! जाणून घ्या एका डोससाठी किती पैसे मोजावे लागतील?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ नोव्हेबर । मुंबईत १८ वर्षांवरील पात्र व्यक्तींना पहिल्या लशीच्या मात्रेचे प्रमाण ९९ टक्के आणि दुसऱ्या मात्रेचे लसीकरण ६० टक्क्यांवर गेले आहे. त्याचवेळी, केंद्र सरकारने ‘झायकोव्ह-डी’ या करोनाप्रतिबंधक लशीच्या मात्रा घेण्याचे ठरविले आहे. त्यापाठोपाठ, पालिकेनेही १२ वर्षांखालील सुमारे १० लाख मुलांच्या लसीकरणाची जय्यत तयारी केली आहे.

मुलांच्या लसीकरणासाठी पालिकेकडून नियोजन हाती घेतले जात आहे. लहान मुलांना लस देताना सुईचा वापर टाळला जाणार असून, त्याऐवजी ‘जेट अॅप्लिकेटर’चा वापर केला जाणार आहे. लसीकरणासाठी २८ दिवसांच्या अंतराने तीन मात्रा दिल्या जाणार आहेत. त्या प्रत्येक मात्रेची किंमत ही केंद्र सरकारच्या निर्णयानुसार ३५८ रुपये इतकी असेल. तसेच, मुलांचे लसीकरण अधिक सुलभ व्हावे म्हणून लसीकरण केंद्रांवर विशेष बूथची व्यवस्था केली जाणार आहे. तसेच त्यासाठी पालिका कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

पालिकेने १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू केली असून, मुंबईकरांनी त्यास मोठ्या प्रमाणात सहकार्य केले आहे. सध्या करोना नियंत्रणात असल्याने राज्य सरकार, पालिकेने अनेक निर्बंध कमी केले आहेत. त्याचप्रमाणे, १८ वर्षांवरील पात्र व्यक्तींच्या लसीकरणापाठोपाठ मुलांचे लसीकरण कधी होणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यासाठी पालिकेने नायर रुग्णालयात दोन ते १८ वर्षांवरील १५ मुलांवर लशींची घेतलेली चाचणी यशस्वी ठरली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *