महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ नोव्हेबर । राज्य शिक्षण मंडळाकडून (Maharashtra education board) फेब्रुवारी- मार्च – २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा (ssc exam) या ऑफलाईन पद्धतीनेच (offline) घेतल्या जाणार आहेत. यासाठीची तयारी मंडळाकडून केली जात असून त्यासाठी धोरणात्मक निर्णय लवकरच जाहीर केला जाणार आहे. दहावी-बारावीची लेखी परीक्षा (hsc exam) ही ऑफलाईन पद्धतीने घेण्यासाठी नुकतेच शालेय शिक्षण विभागाकडून चाचपणी करण्यात आली असून त्याला पालक- विद्यार्थ्यांसह (student-parents permission) विविध तज्ज्ञांनी आपली संमती दर्शवली आहे. यामुळेच मंडळाकडून मागील काही दिवसात यासंदर्भातील तयारीसंदर्भात अनेक बैठका घेतल्या असल्याचे अधिकारी सूत्राकडून सांगण्यात आले.
कोरोना आणि त्याच्या प्रादुर्भावामुळे राज्य शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च-२०२१ मधील आपल्या सर्व लेखी परीक्षा रद्द केल्या होत्या. त्यानंतर विद्यार्थ्यांना अंतर्गत मुल्यमापनाच्या आधारे गुण देऊन उत्तीर्ण करण्यात आले होते. यामुळे भरमसाठ गुणवाढ झाल्याने त्यावर अनेक प्रश्नचिन्ही निर्माण झाले होते. मात्र आता राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने दहावी-बारावीच्या परीक्षा या ऑफलाईन पद्धतीने घेण्याचे नियोजन केले जात असून त्यासाठी मंडळाने आपल्या नऊ विभागीय मंडळातून तयारीची माहितीही गोळा केल्याचे अधिकारी सूत्राकडून सांगण्यात आले. तर दुसरीकडे यासाठीचा धोरणात्मक निर्णय मंत्रालय स्तरावरून जाहीर केला जाणार असल्याचीही माहिती सूत्राकडून देण्यात आली.