महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० नोव्हेबर । पुणे । गेल्या काही कालावधीत राज्यातील करोना रुग्णसंख्येत वाढ झालेली नसल्याने दिवाळी सुटीनंतर शहरी आणि ग्रामीण भागातील सर्व वर्ग सुरू करण्याची मागणी करण्यात येऊ लागली आहे. ऑक्टोबरमध्ये ग्रामीण भागात पाचवी ते बारावी आणि शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाल्यानंतर आता ग्रामीण भागातील पहिली ते चौथी, शहरी भागातील पहिली ते आठवीचे वर्ग सुरू करण्याबाबत शिक्षण विभागही सकारात्मक असल्याने राज्य शासन परवानगी देणार का, असा प्रश्न आहे.
ऑनलाइन शिक्षणातील त्रुटी आणि मर्यादांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी करोना रुग्ण नसलेल्या भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली. त्यानंतर अन्य वर्ग सुरू करण्याबाबतची मागणी सातत्याने होऊ लागल्याने ४ ऑक्टोबरपासून शहरी भागातील आठवी ते बारावीचे आणि ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले. मात्र ग्रामीण भागातील पहिली ते चौथीच्या, शहरी भागातील पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.
हिवरे बाजारसारख्या काही ठिकाणी स्थानिक पातळीवर जबाबदारी घेऊन सर्व वर्गांच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र सर्व वर्ग सुरू करण्याचा निर्णय शासनाकडून अद्याप घेण्यात आलेला नसल्याने बहुतांश ठिकाणी शक्य असूनही सर्व वर्ग सुरू करता आलेले नाहीत. या लालफितीच्या कारभाराचा फटका शिक्षकांची सर्वाधिक गरज असलेल्या पहिलीपासूनच्या विद्यार्थ्यांना बसत आहे. त्यामुळे राज्यातील शाळांतील सर्वच वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्याची मागणी शिक्षण क्षेत्रातून करण्यात येत आहे.