महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० नोव्हेबर । करोनासंदर्भातील निर्बंध शिथिल होऊ लागल्यानंतर परराज्यातून मुंबईत येणाऱ्यांचा ओघ वाढू लागला आहे. सप्टेंबरमध्ये मुंबईत मध्य रेल्वेवर मेल एक्स्प्रेसमधून १७ लाख २७ हजार प्रवासी, तर पश्चिम रेल्वेवर ऑक्टोबरमध्ये १८ लाख ८१ हजार प्रवासी दाखल झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. जून, जुलैच्या तुलनेत यात काहीशी वाढ झाली आहे.
गेल्या वर्षापासून करोनाचे निर्बंध लागू होताच मेल-एक्स्प्रेसमधून प्रवासी वाहतुकीसाठीही नियमावली लागू झाली. फक्त तिकीट निश्चित असणाऱ्यांनाच प्रवेश देण्याचा निर्णय घेताना एका रेल्वेगाडीच्या आसनक्षमतेच्या निम्म्या प्रवाशांनाच तिकीट दिले जात होते. दिल्ली, गोवा, दक्षिणेकडील राज्य, पश्चिम बंगाल, गुजरात येथून येणाऱ्या प्रवाशांची चाचणीही करण्यात येऊ लागली. त्यानंतर या नियमावलीत हळूहळू बदल होत गेले. आता राज्यातील निर्बंध अधिकच शिथिल केल्यानंतर मुंबई महानगरात मेल-एक्स्प्रेसने येणाऱ्यांची संख्याही हळूहळू वाढू लागली आहे.
मध्य रेल्वेच्या सीएसएमटी, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण आणि पनवेल स्थानकांत मेल-एक्स्प्रेस प्रवासी उतरतात, तर पश्चिम रेल्वेच्या वांद्रे टर्मिनस, मुंबई सेन्ट्रल, बोरिवली, वसई येथे गाड्यांना थांबा आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात जून २०२१ मध्ये १० लाख ३१ हजार प्रवासी दाखल झाले होते. ऑगस्टमध्ये ही संख्या १६ लाख ६४ हजार झाली आणि सप्टेंबरमध्ये हाच आकडा १७ लाख २७ हजारांपर्यंत पोहोचला. त्यामुळे यात वाढच दिसत आहे. पश्चिम रेल्वेवरही जुलै २०२१ मध्ये १७ लाख ४५ हजार प्रवासी दाखल झाले होते. सप्टेंबरमध्ये हीच संख्या १९ लाख ३५ हजार होती. ऑक्टोबरमध्ये ती १८ लाख ८१ हजारांपर्यंत वाढली.
जुलै ते ऑक्टोबर या चार महिन्यांत गुजरातमधून एकूण २९ लाख ६९ हजार प्रवासी मुंबई महानगरात दाखल झाले. त्यापाठोपाठ दिल्ली, पंजाबमधून येणाऱ्यांची संख्या अधिक आहे, तर दररोज मुंबईत ७० मेल-एक्स्प्रेस येतात. गेल्या तीन ते चार महिन्यांत उत्तर प्रदेश, बिहार, दक्षिणेकडून मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात येणारे प्रवासी अधिक आहेत.