महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० नोव्हेबर । कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणात औरंगाबाद जिल्हा राज्यात थेट २६ व्या स्थानी आहे. याबाबत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिल्हा प्रशासनाला जाब विचारून तातडीने उपाययाेजना करण्याच्या सूचना दिल्या हाेत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ३० नाेव्हेंबरपर्यंत १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे प्रशासनानेही आता कडक धोरण अवलंबले आहे. लसीची किमान एकही मात्रा न घेतलेल्या नागरिकांना पेट्राेल, गॅस, रेशन मिळणार नाही. तसेच जिल्ह्यात पर्यटनस्थळांवर प्रवेश मिळणार नाही. खासगी किंवा सरकारी वाहनाने प्रवासबंदी करण्यात आली आहे. शिवाय पर्यटनस्थळांवर असलेल्या हॉटेल, रिसॉर्ट, दुकाने आदींमधील कर्मचाऱ्यांनादेखील लसीकरण सक्तीचे केले आहे. ९ नाेव्हेंबरपासून जिल्ह्यात हे आदेश लागू झाले आहेत.
राज्यात लसीकरणाची सरासरी ७४ टक्क्यांवर असताना औरंगाबाद जिल्ह्यात मात्र आजवर केवळ ५५ टक्के नागरिकांनी लसीचा एक डाेस तर २३ टक्के नागरिकांनी दाेन्ही डाेस घेतले आहेत. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लसीकरणाचे प्रमाण वाढणे आवश्यक आहे. त्यासाठी महापालिका व जिल्हा प्रशासनाकडून सातत्याने आवाहन केले जाते. मात्र जाेपर्यंत काेराना रुग्णवाढीचे प्रमाण जास्त हाेते ताेपर्यंत लाेक गांभीर्याने लसीकरणाला प्रतिसाद देत हाेते. गेल्या दाेन महिन्यांपासून रुग्णसंख्या झपाट्याने घटल्यामुळे लाेकांमध्ये लसीकरणाचे गांभीर्य राहिलेले नाही. पुरेसा साठा उपलब्ध असतानाही लाेक डाेस घेण्यासाठी पुढे येत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा धाेका उद्भवण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पहिल्या टप्प्यात काही निर्बंध लागू केले आहेत. आता जर प्रतिसाद मिळाला नाही तर हे निर्बंध आणखी वाढू शकतात. प्रशासनाने यापूर्वीच काेणतेही शासकीय प्रमाणपत्र काढण्यासाठी किंवा शासकीय कार्यालयात प्रवेशासाठी लसीकरण सक्तीचे करण्याबाबत सूताेवाच केले आहे. त्याचीही अंमलबजावणी पुढच्या टप्प्यात हाेऊ शकते.
नो व्हॅक्सिन, नो एंट्री : लस घेतली नसेल तर औरंगाबादेत पर्यटन, प्रवासबंदी
– बीबी का मकबरा, औरंगाबाद लेणी, पितळखाेरा, अजिंठा लेणी, दाैलताबाद किल्ला, वेरूळ लेणी आदी पर्यटनस्थळांसाठी हा आदेश लागू आहे.
– पर्यटनस्थळी असलेल्या सर्व हॉटेल्स, रिसॉर्ट, दुकाने यामधील कर्मचारी व मालकांनी लसीची किमान एक तरी मात्रा घेतलेली असणे आवश्यक आहे.
– पर्यटनाशी संबंधित सर्व सरकारी कार्यालये व पर्यटन आयोजकांना कोविड प्रतिबंधात्मक लसीच्या दोन्हीही मात्रा सक्तीच्या करण्यात आल्या आहेत.
– जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी पर्यटनस्थळी लसीकरणाचे बूथ लावावेत व नागरिकांना लस घेण्यास प्रोत्साहित करावे.
– पेट्राेल पंप, गॅस एजन्सी, स्वस्त धान्य दुकाने व कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी लसीकरण प्रमाणपत्राची खातरजमा केल्यानंतरच ग्राहकांना सुविधा द्याव्यात, कृषी मालाचे पैसे द्यावेत.
– लसीची एकही मात्रा न घेतलेल्या नागरिकांना सरकारी अथवा खासगी गाडीने आंतरराज्य, आंतरजिल्हा प्रवास करता येणार नाही.