राज्यात थंडीची सुरुवात, किमान तापमानात घट; मात्र पुन्हा पावसाचा अंदाज

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ नोव्हेबर । निरभ्र आकाशामुळे उत्तर भारताकडून राज्याकडे थंड वाऱ्याचा प्रवाह वाढला आहे. परिणामी राज्यातील बहुतांश भागात गेल्या दोन दिवसांपासून थंडावा जाणवत आहे. मात्र, दक्षिण भारतात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे शुक्रवारपासून रविवारपर्यंत राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

सध्या राज्यात किमान तापमानात घट होत आहे. उत्तरेकडील वारे महाराष्ट्राकडे आल्याने राज्यात गारठा वाढला आहे. दिवसभर कोरड्या हवामानासह बुधवारी गारठा कायम होता. गुरुवारीदेखील राज्यभरात गारठा कायम राहणार आहे.

दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झाले असून, हा तीव्र कमी दाबाचा पट्टा ११ नोव्हेबरपर्यंत तमिळनाडूच्या किनारपट्टीकडे सरकणार आहे. या तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यांची तीव्रता कायम राहणार असून, हा पट्टा तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीकडील करायकल व श्रीहरी कोटा दरम्यान थांबणार आहे.

हवामान…शुक्रवार, शनिवार आणि रविवारी राज्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. शुक्रवारी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात, तर शनिवारी कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद आणि लातूर या सहा जिल्ह्यांत आणि रविवारी राज्यातील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

नीचांकी नोंद… बुधवारी राज्यात नीचांकी तापमानाची नोंद जळगाव शहरात ११ अंश सेल्सिअस एवढी झाली, तर पुणे शहरात ११.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. अनेक शहरांमध्ये महाबळेश्वरपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली आहे.

पावसाचे कारण… दक्षिण अरबी समुद्रात आणखी एक कमी दाबाचा पट्टा आणि चक्रीवादळ याची तीव्रता कायम आहे. १३ नोव्हेंबरला अंदमानच्या समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन ४८ तासांत त्याची तीव्रता वाढणार आहे. या तीनही स्थितीच्या परिणामामुळे राज्यातील काही भागात ढगाळ वातावरणासह मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)

जळगाव ११, पुणे ११.८, अमरावती १२.६, गोंदिया १२.६, नाशिक १२.७, औरंगाबाद १२.८, सोलापूर १३.१, बीड १३.१, परभणी १३.२, नागपूर १३.२, महाबळेश्वर १३.५, वर्धा १३.८, वाशिम १४, नगर १४.१, अकोला १४.८, सातारा १५.९, नांदेड १६, सांगली १६.२ आणि कोल्हापूर १७.७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *