महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ नोव्हेबर । महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या कर्नाटक, गोवा, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये स्थानिक राज्य शासनाने इंधनावरील करात मोठी कपात केली आहे. परिणामी, महाराष्ट्राच्या तुलनेत शेजारी राज्यांमध्ये पेट्रोल व डिझेल (Petrol and Diesel) बर्याच स्वस्तात उपलब्ध होत असल्याने महाराष्ट्रातील खासगी आणि मालवाहतूक करणारी वाहने सीमेबाहेर जाऊन पेट्रोल व डिझेल भरणा करत आहेत.
ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे बाल मल्कित सिंह यांनी सांगितले की, राज्य शासन पेट्रोल, डिझेलवरील कर कमी करत नसल्याने सीमेवर राहणारे नागरिक आणि एका राज्यातून दुसर्या राज्यात मालवाहतूक करणारी वाहने शेजारच्या राज्यांतील पेट्रोल पंपांवर जाऊन इंधन भरू लागली आहेत.
त्यामुळे या राज्यांमधील सीमेजवळच्या पेट्रोल पंपांवरील इंधनाची विक्री तब्बल 50 टक्क्यांनी वाढल्याचेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात करकपात होऊन पेट्रोल, डिझेलची (Petrol and Diesel) स्वस्ताई येत नाही तोपर्यंत शेजारी राज्यांतील पेट्रोल पंपांचाच धंदा जोरात चालणार, असे ते म्हणाले.
* सिंधुदुर्गात पेट्रोलचे दर 111.89 रुपये असून गोव्यामध्ये पेट्रोलचे दर 84.80 रुपये प्रतिलिटर आहे. सिंधुदुर्गमध्ये डिझेलचा दर 94.63 रुपये प्रतिलिटर असून गोव्यामध्ये डिझेलचा दर 81.20 रुपये इतका आहे.
* महाराष्ट्राच्या तुलनेत गोव्यात पेट्रोल तब्बल 25 रुपयांनी, तर डिझेल 12 रुपयांनी स्वस्त आहे.
* महाराष्ट्रातील नांदेडमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 112.41 रुपये असताना शेजारच्या तेलंगणा राज्यात पेट्रोल 110.06 रुपयांना उपलब्ध आहे. (Petrol and Diesel)
* गोंदियामध्ये पेट्रोलचा दर 111.36 रुपये असून शेजारच्या छत्तीसगडमध्ये तेच पेट्रोल 102.50 रुपये प्रतिलिटरला मिळत आहे. म्हणजेच 9 रुपयांची तफावत आहे.
* अमरावतीमध्ये पेट्रोल 111.49 रुपयांनी मिळत असताना नजीकच्या मध्य प्रदेशात 108.64 रुपयांना पेट्रोल उपलब्ध होत आहे. मध्य प्रदेशात राज्याच्या तुलनेत तीन रुपयांनी पेट्रोल स्वस्त आहे.
* महाराष्ट्रात 95.69 रुपयांना मिळणारे डिझेल मध्य प्रदेशात 92.17 रुपये, अर्थात तीन रुपये स्वस्त मिळत आहे.
* महाराष्ट्रात 110.77 रुपये असलेले पेट्रोल शेजारच्या गुजरातमध्ये 98.40 रुपयांना विक्री होत आहे. तब्बल 12 रुपये स्वस्त दराने पेट्रोल मिळत असल्याने वाहन चालक नजीकच्या राज्यांत धाव घेत आहेत.
* महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरातमध्ये डिझेलचे दरही अनुक्रमे 93.53 रुपयांच्या तुलनेत 90.30 रुपये म्हणजेच तीन रुपयांनी स्वस्त झाले आहे.
* पालघरमध्ये 110.35 रुपये दराने मिळणारे पेट्रोल गुजरातमध्ये मात्र 93.08 रुपये दराने मिळत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पेट्रोलच्या दरात 17 रुपयांची तफावत आहे.
* पालघरमध्ये 93.08 रुपयांना विक्री होणारे डिझेल सिल्वासामध्ये फक्त 86.96 रुपयांनी विकले जात आहे. सात रुपयांची तफावत असल्याने वाहनचालकांची पसंती पालघरऐवजी सिल्वासाला मिळत आहे.