एसटी संप ; एसटी कर्मचारी बंदवर ठाम

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ नोव्हेबर । राज्य शासनामध्ये एसटी विलीनीकरण करावे, या मागणीसाठी सुरू असलेल्या बंदमध्ये जिल्ह्यातील साडेचार हजार कर्मचारी आजही सहभागी आहेत. अन्य काही जिल्ह्यांप्रमाणे फूट पडलेली नाही. राजापूरमधून अवघ्या दोन फेऱ्‍या सोडण्यात आल्या. राज्यात विविध ठिकाणी काही कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील काही कर्मचारी कामावर रुजू होतील, अशी शक्यता होती.

राज्य सरकारनेही बंद मागे घेण्याचे आवाहन केले आहे; परंतु जिल्ह्यातील कर्मचाऱ्‍यांकडून त्याला प्रतिसाद नाही. त्यामुळे एसटी सेवा सुरू होण्याची आशा दिवसभर मावळली होती. एसटी प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार राजापूर आगारामधून नाटे मार्गावर दोन फेऱ्‍या आज सोडण्यात आल्या. ते वगळता सलग पाचव्या दिवशीही जिल्ह्यातील साडेचार हजार कर्मचारी विविध आगारांच्या ठिकाणी बंदमध्ये सहभागी होते.

माळनाका येथील विभागीय कार्यालयापुढे आंदोलन सुरु आहे. मनसेनेही एसटी संघटनेला पाठिंबा दिला आहे. बंदमुळे पाच दिवसांमध्ये एसटी प्रशासनाचे अडीच कोटींहून अधिक नुकसान झाले आहे. राज्यात अनेक ठिकाणी वडापच्या गाड्या बस स्थानकात उभ्या करून प्रवाशांची सोय केली जात होती. रत्नागिरीतील एकाही स्थानकामधून अशी व्यवस्था नाही. बंदचा सर्वधिक फटका ग्रामीण भागात बसला असून, शहरांमधील मोठ्या बाजारपेठेंवर परिणाम झाला आहे. ग्राहकांमध्ये पन्नास टक्के घट झाल्याचा अंदाज व्यावसायिकांनी वर्तविला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *