महाराष्ट्र 24 -बीजिंग
कोरोना व्हायरसच्या फैलावामुळे चीनबरोबरच जगभर हाहाकार माजलेला आहे. जगभरात 85 हजारांहून अधिक लोकांना या विषाणूचा संसर्ग झाला आहे. एकट्या चीनमध्येच तीन हजारांपेक्षाही अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अद्यापही या आजारावर रामबाण औषध नसल्याने हा संसर्ग टाळण्यासाठी काळजी घेणे हाच सर्वोत्तम उपाय आहे. त्यासाठी हस्तांदोलन टाळणे, वारंवार हात धुणे आदी उपाय सांगितले जातात. चीनमध्ये हस्तांदोलन म्हणजेच हँडशेक टाळण्यासाठी आता काही लोक लेगशेकचा वापर अभिवादनासाठी करीत आहेत! त्याचा एक व्हिडीओही आता व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओत एक मास्क घातलेली व्यक्ती आपल्या गाडीतून उतरते. त्याला पाहताच त्याचा मित्र हात पुढे करीत समोर येतो, मात्र हस्तांदोलन धोकादायक आहे हे जाणून दोघेही हात मागे घेतात व हात मिळवण्याऐवजी पाय मिळवतात! असाच आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये सामान्य व्यक्तीच नव्हे तर नायजेरियातील लागोस स्टेटचे गव्हर्नर सॅनवो-ओलू हेही हँडशेकऐवजी लेगशेक करीत असताना दिसून येतात. अभिवादनासाठी भारतीय पद्धतीने हात जोडणे हा एक चांगला मार्ग असल्याचा आता जगभर प्रचार होत आहे.