महाराष्ट्र 24-मुंबई :
रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातल्यानंतर देशभरातील येस बँकेचे खातेदार व ठेवीदारांचा आक्रोश कायम आहे. बँकांच्या शाखेत एटीएममधूनही पैसे मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. येस बँकांच्या शाखांना अनेक ठिकाणी पोलिस छावणीचे स्वरूप आले असून, प्रत्येक शाखेबाहेर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. बँकेचे नेट बँकिंग, मोबाईल ऑफ डेबिट आणि क्रेडिट कार्ड, चेक क्लिअरिंग व एटीएम सेवाही खंडित झाली आहे. गुगल पे, फोन पेसारखी मोबाईल वॉलेटस् आणि इतर बँकांच्या एटीएममधून येस बँक खातेदारांना व्यवहार करता येत नसल्याने बँक खातेदारांची कोंडी झाली आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने येस बँकेच्या व्यवहारांवर निर्बंध घातल्याने धास्तावलेल्या खातेदारांनी शनिवारी दुसर्या दिवशी अंधेरी एमआयडीसी, चेंबूरच्या मैत्रीपार्क, महर्षी दयानंद सरस्वती मार्ग, स्वस्तिक पार्क, मालाड, मुलुंड आणि भांडूप येथील बँकेच्या शाखांबाहेर पैसे काढण्यासाठी मोठी गर्दी केली होती. शाखेच्या बाहेरील गर्दी पाहून अनेकजण रिकाम्या हाताने घरी परतले. मागील दोन दिवसांपासून बँकेची नेट बँकिंग, मोबाइल अॅप, डेबिट आणि क्रेडीट कार्ड, चेक क्लिअरिंग आणि एटीम सेवा पूर्णपणे खंडीत करण्यात आली आहे. त्यामुळे खात्यातून पैसे ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न करणार्या ग्राहकांना मन:स्ताप सहन करावा लागला. दरम्यान, निर्बंधानंतर बहुतेक शाखांना पोलीस छावणीचे स्वरूप आले असून प्रत्येक शाखेबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. येस बँकेतून एका ग्राहकाला केवळ 50 हजार रुपये काढता येणार असल्याचे वृत्त ग्राहकांना समजताच शनिवारीही सकाळी येस बँकेच्या अंधेरी येथील मुख्य शाखेत गर्दी झाली. मुख्य कार्यालयात येऊन अनेक ग्राहक आपल्या खात्याबाबत आणि रक्कमेची मागणी आणि विचारपूस करत होते. बँकेबाहेर पोलिसांचा बंदोबस्त पहायला मिळत होता. शनिवारी सकाळी मुख्य बँकेबाहेर हजारो ग्राहकांनी पैसे मिळण्यासाठी गर्दी केली होती. सकाळी आलेल्या दोनशे ते तीनशे ग्राहकांना टोकन देण्यात आले. ग्राहकामार्फत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी बँकेने दक्षता घेतली. बँक कर्मचारी यांनी ग्राहकांना क्रमांक्रमाने आत सोडत होते. अनेक शाखांमध्ये हजारो ग्राहक हातात चेक बुक घेऊन तासनतास रांगेत ताटकळत असल्याचे पहायला मिळत होते. बँक बंद होईल या धास्तीने अनेक ग्राहकांनी 50 हजार रुपये रोख रक्कम काढून बँकेतून काढून घेतली. अंधेरीत 4 वाजेपर्यंत बँक बंद होण्यापूर्वी साडे तीनशे ते चारशे जणांना आपल्या खात्यातून पैसे काढता आले. तर काही ग्राहकांच्या पदरी निराशा आली. या ग्राहकांना खात्यातून पैसे काढण्यासाठी सोमवारची वाट पहावी लागणार आहे. असाच प्रकार चेंबूरमध्येही पहायला मिळाला. येथील अनेक शाखांवर खातेदारांनी सकाळी 7 वाजल्यापासून गर्दी केली होती. पण, अनेकांना वेळेअभावी पैसे काढता आले नाहीत.