महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ नोव्हेबर । ज्या व्यक्ती सकाळी उठल्या उठल्या एक ग्लास (Water) पाणी पितात, त्यांची पचनशक्ती चांगली राहते असं म्हटलं जातं. आयुर्वेदानुसार सकाळी उठल्या उठल्या पाणी प्यायचं असेल, तर ते गरम किंवा कोमट असावं, असं म्हटलं जातं. पचनसंस्था चांगली राहिली, तर आजारी पडण्याचं प्रमाण साहजिकच कमी असतं. आंघोळीनंतरही एक ग्लास पाणी पिणं फायद्याचं ठरतं. त्यामुळे रक्ताभिसरण व्यवस्थित होतं. दररोज रात्री झोपण्याच्या आधी कमीत कमी अर्धा ग्लास पाणी प्यायल्यास हार्ट अॅटॅकची (Heart Attack) शक्यता कमी होते, असं म्हटलं जातं. याव्यतिरिक्तही पाणी पिण्याचे काही नियम आणि फायदे सांगितले जातात. ते जाणून घेऊ या.
खाल्लेल्या अन्नाचं पचन पूर्ण झाल्यानंतर पाणी प्यावं. अन्नपचन झाल्यानंतर पाणी प्यायल्यास ते अमृतासमान मानलं जातं आणि शरीराला भरपूर ऊर्जा प्रदान करतं. त्यामुळे पचनसंस्था योग्य रीतीने काम करत राहते. त्यामुळे अपचन, गॅसेस, बद्धकोष्ठता आदी समस्या उद्भवत नाहीत. जेवणाच्या अर्धा तास आधी एखाद-दुसरा ग्लास पाणी प्यायला हरकत नाही; मात्र जेवताना पाणी प्यायची गरज भासल्यास एखाद-दुसरा घोट एवढंच पाणी प्यावं. तसं केल्यास अन्नपचन लवकर होतं आणि पचनशक्ती मजबूत होते.
पाणी उष्म्यापासून वाचवतं. आवश्यकतेएवढं पाणी प्यायलं नाही, तर शरीराचं तापमान खूप वाढू शकतं. त्याचा दुष्परिणाम होतो. पुरेसं आणि योग्य पद्धतीने पाणी न प्यायल्यास शरीराची काम करण्याची गती कमी होत जाते, थकवा वाढतो आणि चयापचयाची (Metabolism Rate) गतीही मंदावते.अन्नपचनासाठी आपल्या पोटात विकरांची (Enzymes) निर्मिती होते. ती आम्लधर्मी अर्थात अॅसिडिक (Acidic) असतात. योग्य प्रमाणात पाणी न प्यायल्यास अॅसिडिटी वाढत राहते.
पाणी जास्त प्रमाणात पिणाऱ्यांना किडनी स्टोन (Kidney Stone) अर्थात मूतखडा होण्याचा धोका जवळपास नसतोच. कारण पाणी जास्त पीत असल्यामुळे शरीरातली हानिकारक तत्त्वं मूत्राद्वारे वेळोवेळी बाहेर पडून जाण्यास मदत होते.झोपण्याच्या एक तास आधी एक ग्लास पाणी प्यायल्यास हार्ट अॅटॅक येण्याचा धोका कमी असतो. आंघोळीनंतर एक ग्लास पाणी प्यायल्यास कमी रक्तदाबाची (Low Blood Pressure) समस्या उद्भवत नाही.