महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६ नोव्हेबर । साईबाबांच्या दर्शनासाठी दिल्या जाणाऱया ऑनलाइन दर्शनपासच्या सावळ्या गोंधळाचा फटका साईभक्तांना बसला आहे. ऑनलाइन पास काढताना पैसे कापले जातात. मात्र, पास मिळत नसल्याने संतप्त साईभक्तांनी आज मंदिरासमोर तीन तास ठिय्या आंदोलन केले. अखेर सामोपचाराने हे प्रकरण मिटवून साईभक्तांना दर्शन देण्यात आले.
शिर्डीचे साईमंदिर 7 ऑक्टोबर रोजी उघडण्यात आले. मात्र, नगर जिह्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर ऑफलाइन दर्शनपास काउंटर बंद ठेवण्यात आलेले आहे. केवळ 15 हजार भाविकांना ऑनलाइन दर्शनपास दिले जात आहेत. मात्र, साई मंदिराची वेबसाइट कायम हँग होत असल्याने भाविकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ऑनलाइन पास काढताना पैसे कापले जातात. मात्र, पास मिळत नसल्याने आज संतप्त भाविकांनी मंदिरासमोर ठिय्या मांडला होता. साईनामाचा गजर करत दर्शनासाठी सोडण्याची मागणी साईभक्त करत होते. साईसंस्थान प्रशासनाने मात्र लवकर त्यांची दखल घेतली नाही.