महेश मोतेवारला कोठडी ; ठेवीदारांना दिलासा भेटणार का ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ नोव्हेबर । ‘समृद्ध जीवन मल्टीस्टेट’च्या सुमारे साडेचार हजार कोटींच्या घोटाळ्याचा प्रमुख महेश मोतेवार यास बीड पोलिसांनी ताब्यात घेतले. शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्यास सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

बीडमध्ये तीन वर्षापूर्वी अंदाजे पन्नास कोटी रुपयांना गंडा घालून ‘समृद्ध जीवन’ ने गाशा गुंडाळला होता. मोतेवारच्या अटकेमुळे ठेवीदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. २०१० मध्ये समृद्ध जीवन मल्टीस्टेट को.ऑप. सोसायटीची शाखा बीडमध्ये सुरू झाली होती. काही वर्षातच संस्थेने शहरातील सारडा कॅपिटल या मोक्याच्या ठिकाणी अकरा महागडे गाळे खरेदी करून तिथेच कार्यालय थाटले. पाच वर्षात दाम दुप्पट, तिप्पट तसेच दागिने आणि कपड्यांचे प्रलोभने दाखवून त्याने ठेवीदारांना भुरळ घातली. २०१७ मध्ये एका रात्रीतून संस्थेने गाशा गुंडाळला. कार्यालय देखील बंद करण्यात आले. या प्रकरणात सय्यदा रहेमा सय्यद नियामत (रा.इस्लामपुरा, बीड) यांच्यासह अठरा ठेवीदारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर ३० ऑगस्ट २०१८ रोजी समृद्ध जीवनचा संचालक महेश किसन मोतेवार, प्रतिनिधी सुनीता किसन थोरात व शशिकांत रवींद्र काळकर यांच्याविरुद्ध बीड शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला होता. मात्र, या प्रकरणातील एकही आरोपी पोलिसांना सापडलेला नव्हता. १७ नोव्हेंबर २०२१ रोजी शहर पोलिसांनी गुजरातमधील राजकोट येथील मध्यवर्ती कारागृहातून संचालक महेश मोतेवार यास ताब्यात घेऊन बीडमध्ये आणले. जिल्ह्यातील दहा हजार ठेवीदार समृद्ध जीवनच्या जाळ्यात अडकले असून सुमारे पन्नास कोटींना फसवल्याचा आरोप आहे.

तपासावर प्रश्नचिन्ह

या प्रकरणात गुन्हा दाखल असला तरी त्याचा तपास मात्र एका सहायक पोलीस उपनिरीक्षकांकडेच आहे. गुन्हा नोंद झाल्यापासून आतापर्यंत तब्बल सात तपास अधिकारी बदलले आहेत. दोन महिन्यांपूर्वी उपनिरीक्षकांकडील तपास काढून तो शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवि सानप यांच्याकडे वर्ग झालेला आहे. पन्नास लाख रुपयांपेक्षा अधिक आर्थिक घोटाळ्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवला जातो. मात्र, या प्रकरणात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा असूनही तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे का सोपवला गेला नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *