महाराष्ट्र 24-कानपूर
कानपूरमध्ये 4,000 हून अधिक शौचालये बांधणार्या मिस्त्री कलावती, वयाची शंभरी पूर्ण केलेल्या अॅथलेटिक खेळाडू मन कौर, झारखंडमधील लेडी टारझन आणि मशरूम महिला बिना देवी यांच्यासह 15 जणींचा जागतिक महिला दिनानिमित्त ‘नारी शक्ती’ पुरस्काराने गौरव करण्यात आला. गेमचेंजर आणि समाजात सकारात्मक बदलातील महत्त्वाचा घटक ठरलेल्या या महिलांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते गौरविण्यात आले. बिना देवी यांनी मशरूम शेती आणि मशागत नावारूपाला आणली आहे. टाटा ट्रस्टतर्फे 700 महिलांना डिजिटल साक्षरतेसाठी प्रशिक्षण दिले आहे.
तसेच 103 वर्षांच्या खेळाडू मन कौर यांनी 93 वर्षी क्रीडा क्षेत्रातील करिअरला सुरुवात करून जागतिक मास्टर्स अॅथलेटिक चॅम्पियनशिप स्पर्धेत ट्रॅक अँड फिल्ड प्रकारात 4 सुवर्णपदके जिंकली. जगातील शंभरी पार केलेल्या सर्वात वेगवान अॅथलिट त्या ठरल्या आहेत. कानपूरच्या मिस्त्री कलावती यांनी 4,000 हून अधिक शौचालये बांधली आहेत.
आदिवासी स्त्रियांसाठी काम करणार्या पदला भूदेवी, हँडिक्राफ्टमधील कामासाठी काश्मीरमधील आरिफा जैन, झारखंडमधील पर्यावरणवादी आणि लेडी टारझन अशी ओळख असलेल्या 25 लाख रोपांचे वनीकरण केलेल्या चामी मुर्मू, लडाखची पारंपरिक चव असलेेले खाद्यपदार्थ देणारे रेस्टॉरंट चालवणार्या निल्झा वँगमो, ऑटोमोबाईलमधील संशोधन आणि विकास क्षेत्रात कार्यरत रश्मी उर्ध्वदेशे, उत्तराखंडमधील जुळ्या बहिणी ज्यांनी 2013 मध्ये एव्हरेस्टवर चढाई केली त्या ताशी आणि नुंगशी मलिक, शास्त्रीय गायिका कौशिकी चक्रवर्ती आदींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात
आले.
महिला फायटर पायलटस्चा गौरव
महिला फायटर पायलट अवनी चतुर्वेदी, मोहना सिंह, भावना कांत या तिघींचाही या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. या तिघींना 2016 मध्ये हवाई दलात फायटर पायलट होण्यासाठी प्रवेश देण्यात आला होता. त्या लढाऊ विमाने उडवू शकतात. फ्लाईंग ऑफिसर अवनी चतुर्वेदी यांनी मिग-21 बायसन हे लढाऊ विमान एकटीने उडवून नवा इतिहास रचला आहे. फ्लाईट लेफ्टनंट भावना कांत यांनी मिग-21 विमानावरील प्रशिक्षण पूर्ण केले. फ्लाईट लेफ्टनंट मोहना सिंह या हॉक अॅडव्हान्स विमान मिशन पार पाडण्यास सक्षम आहेत.