तोट्यातील एअर इंडियाला खासगी क्षेत्राकडून मिळाले काम!

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24-मुंबई
तोट्यात असलेल्या एअर इंडिया या सरकारी विमानसेवा कंपनीला खासगी क्षेत्राकडून नवे काम मिळाले आहे. गो एअर व इंडिगोने त्यांच्या ताफ्यात असलेल्या विमानांच्या त्रुटीयुक्त इंजिनांच्या दुरुस्तीसाठी या सरकारी कंपनीकडे धाव घेतली आहे. विमानतळामागील एअर इंडियाच्या कलिना येथील विमान देखभाल व दुरुस्ती केंद्रात (एमआरओ) हे काम होणार आहे.

गो एअर व इंडिगोच्या ताफ्यातील एअरबस कंपनीची ‘३२० नीओ’ ही अत्याधुनिक विमाने आहेत. या विमानांना प्रॅट अॅण्ड व्हिटने कंपनीचे इंजिन बसविण्यात आले आहे. ही इंजिने इंधन बचतीत अग्रस्थानी आहेत, पण त्यामध्ये बिघाडाच्या अनेक घटना आजवर घडल्या आहेत. अनेकदा एक इंजिन हवेतच बंद पडल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळेच ही सर्व इंजिने ३१ मार्चपूर्वी बदला, असे कडक निर्देश नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) या दोन्ही कंपन्यांना दिले आहेत. त्यानुसार या कंपन्यांनी काम सुरू केले. पण त्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा, यंत्रसामग्री व मनुष्यबळ, या दोन्ह कंपन्यांकडे नाही. परिणामी त्यांना एकीकडे उड्डाणे रद्द करावी लागत आहेत. तसेच ३१ मार्चची कालमर्यादाही जवळ आल्याने दोन्ही कंपन्यांवरील ताण वाढला आहे. यासाठीच त्यांनी या क्षेत्रात मातब्बर असलेल्या एअर इंडियाकडे धाव घेतली आहे.

इंडिगोने आतापर्यंत अशी १५२ त्रुटीयुक्त इंजिने दुरुस्त केली आहेत. पण अद्यापही ६० इंजिनांवर काम होणे बाकी आहे. तर गो एअरने ५४ इंजिने दुरुस्त केली असून, ३२ इंजिनांचे काम बाकी आहे. हे काम लवकर होण्यासाठी या दोन्ही कंपन्यांनी मूळ इंजिनउत्पादक असलेल्या प्रॅट अॅण्ड व्हिटनेवर दबाव आणला होता. त्यामुळे या दोन कंपन्यांच्या रेट्यातून प्रॅट अॅण्ड व्हिटनेनेच एअर इंडियाशी हा करार केला आहे. एअर इंडियाचा कलिना येथील ‘एमआरओ’ मागील ५० वर्षांपासून विमानांच्या संपूर्ण दुरुस्तीसह इंजिन दुरुस्तीवर काम करीत आहेत. त्यामुळेच एअर इंडिया इंजिनीअरिंग सर्व्हिसेस लिमिटेडकडे (एआयइएसएल) सोपविण्यात आल्याने कंपनीने स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *