अहमदाबाद :
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका १२ मार्चपासून सुरू होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. तीन मोठ्या खेळाडूंनी भारताच्या वनडे संघात पुनरागमन केले. या मालिकेसाठीही विराट कोहलीकडेच भारतीय संघाचे नेतृत्व असणार आहे. टीम इंडियाच्या १५ सदस्यीय संघात सुनिल जोशी यांच्या निवड समितीने, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार आणि शिखर धवन यांना संधी दिलेली आहे. रोहित शर्मा अजून दुखापतीमधून सावरलेला नाही. त्यामुळे सलामीवीर शिखर धवनला आणखी एक संधी देण्यात आलेली आहे.
भारत विरुद्ध द. आफ्रिका यांच्यादरम्यान पहिला एकदिवसीय सामना १२ मार्च रोजी खेळला जाणार आहे. त्यानंतर १५ आणि १८ मार्चला अनुक्रमे दुसरा व तिसरा सामना रंगणार आहे. आयपीएलपूर्वी हा भारताचा शेवटचा सामना असणार आहे.
हे खेळाडू बाहेर…
सलामीवीर मयंक अग्रवाल, अष्टपैलू शिवम दुबे, शार्दुल ठाकूर, केदार जाधव आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांना वगळण्यात आले आहे. या खेळाडूंना न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या वन डे मालिकेत संधी देण्यात आली होती.
शुभमन गिलचे पुनरागमन…
शुभमन गिलला पुन्हा एकदिवसीय संघात स्थान मिळाले आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तो कसोटी संघाचाही भाग होता, मात्र एकही सामना खेळलेला नाही. आता एक वर्षानंतर शुभमन गिलला पुन्हा एकदा एकदिवसीय संघात स्थान देण्यात आले आहे. न्यूझीलंडच्या दौर्यावर दुखापत झालेला सलामीवीर रोहित शर्मा अजूनही संघाबाहेर आहे.
टीम इंडिया…
शिखर धवन, पृथ्वी शॉ, विराट कोहली (कर्णधार), के. एल. राहुल, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, शुभमन गिल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी आणि कुलदीप यादव