मावळात सुवासिक इंद्रायणीचा दरवळ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ नोव्हेबर । सुवासिक इंद्रायणी तांदळाचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील मावळात इंद्रायणीचा सुवास दरवळू लागला आहे. इंद्रायणी तांदळाचा हंगाम सुरू झाला असून मावळातील गावागावांतील कापणी अखेरच्या टप्प्यात आली आहे.

मावळात इंद्रायणी तांदळाची लागवड साधारणपणे वीस ते पंचवीस वर्षांपूर्वी करण्यात आली. गेल्या काही वर्षांपासून मावळात आंबेमोहोरची लागवड कमी झाली असून शेतकऱ्यांचा कल इंद्रायणी तांदळाच्या लागवडीकडे वाढला आहे. मावळातील पश्चिम भागातील तुंग, शिळीम, अजवली, जवण, मोरवे, येळसे, कोथुर्णी, वारू, लोहगड, घालेवाडी, महागाव, कडदे, करूंद, इंदोरी गावात इंद्रायणीची लागवड मोठय़ा प्रमाणावर केली जाते. साधारणपणे १२०० हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जाते. जून महिन्यात इंद्रायणीच्या सुवासिक बियाणांची पेरणी केली जाते. पारंपरिक तसेच आधुनिक पद्धतीने मावळातील शेतकरी लागवड करतात. चांगल्या प्रतीचे बियाणे तसेच सेंद्रिय खतांचा वापर केला जातो. त्यामुळे लागवडही उत्तम प्रकारे होती. ऑक्टोबर महिन्यात भात निवडला जातो. त्याला ‘खेड काढणी’ असे म्हटले जाते. इंद्रायणी भातात अन्य जातीचा भात आढळून आल्यास त्याला बाजूला काढले जाते, असे पवनानगरमधील शेतकरी ज्ञानेश्वर ठाकर यांनी सांगितले.

दिवाळीच्या आसपास कापणी सुरू केली जाते. पूर्वी पारंपरिक पद्धतीने कापणी केली जायची. आता यांत्रिक पद्धतीने कापणी तसेच झोडणी केली जात असून एकरी २० ते २५ पोती इंद्रायणी भाताचे उत्पादन निघते. एका पोत्यात ६० ते ७० किलो भात असतो. त्यानंतर व्यापारी तसेच शेतकरी भाताची खरेदी करतात. त्यावर मिलमध्ये प्रक्रिया करून इंद्रायणी तांदळाची विक्री केली जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *